कोविड संशोधनाला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे द्रुतगती 

कोविड संशोधनाला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे द्रुतगती 

पुणे  - डेटा, सुपर कॉम्प्युटिंग, मशिन लर्निंगद्वारे विकसित होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने ‘कोविड’ संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वेळेच्या बचती बरोबरच अचूकता वाढविणाऱ्या या घटकांमुळे कोरोनासंबंधीच्या संशोधनाला द्रुतगती प्राप्त झाल्याचे दिसत आहे. जगभरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर कोविड संशोधनासाठी करण्यात येत आहे. देशातही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) नुकतेच इंटेल इंडिया आणि आयआयटी हैदराबाद यांच्यासोबत सहकार्य करार केला आहे. 

कोविडच्या संशोधनातील "एआय' - 
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कोरोनाचा इतिहास, प्रकार, कार्यपद्धती आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गती आणि अचूकता प्राप्त झाली आहे. खालील तीन प्रकारांत ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. 

१) लसीसंबंधी संशोधन - 
सामान्यत- लस शोधण्यासाठी कमीत कमी १२ ते १८ महिने लागतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्स कोविड-२ विषाणूचे स्ट्रक्‍चर, त्यातील प्रथिने आणि त्याची पेशींमध्ये प्रवेश मिळविण्याची पद्धत आदी गोष्टी उपलब्ध डेटा, कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या माध्यमातून अभ्यासण्यात आली. तसेच, प्रतिजैविकांनी कोविडला दिलेली प्रतिक्रियाही सिम्युलेशनच्या माध्यमातून तपासण्यात आली. प्रत्यक्ष वैद्यकीय चाचणीपूर्वी लसीची अचूकता आणि कार्यक्षमता तपासणे शक्‍य झाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

२) औषधासंबंधी संशोधन - 
औषधांसाठी विविध रसायनांचे स्ट्रक्‍चर आणि विषाणूवरील परिणाम प्रत्यक्ष चाचणीद्वारे तपासावे लागतात. त्यासाठी वेळ आणि संसाधने मोठ्या प्रमाणावर लागते. परंतु सुपर कॉम्प्युटिंग आणि एआयच्या माध्यमातून रसायानांसाठीचे लक्ष्य शोधणे शक्‍य झाले आहे. त्यातून निश्‍चित परिणाम करणाऱ्या रसायनांची अंतिम निवड करणे सहज शक्‍य झाले. 

३) कोरोनाचा प्रसाराचे पूर्वानुमान - 
कोरोनाच्या प्रसारासंबंधी उपलब्ध माहितीच्या आधारे कंप्यूटर सिम्युलेशनद्वारे भविष्यातील प्रसाराचे आडाखे बांधणे शक्‍य झाले आहे. प्रसाराचा दर, बाधित आणि बरे होणारे रुग्ण यांची आकडेवारी यासंबंधीचे पूर्वानुमान आणि आवश्‍यक उपाययोजना शक्‍य झाल्या आहेत. 

देशातील सुपरकंप्युटर खुले - 
१) सी-डॅक - 
कोरोनावरील उपचारांसाठी उपलब्ध औषधांच्या पुणर्वापरासंबंधीचे संशोधन देशात चालू आहे. अशा संशोधनासाठी आवश्‍यक सिम्युलेशन, मशिन लर्निंग आणि कृत्रीम बुद्धीमत्तेसाठी पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कंप्युटींगने (सी-डॅक) सुपर कॉम्प्युटर उपलब्ध करून दिला आहे. देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन यांनी वैज्ञानिक संस्थांना परस्पर सहकार्याचे आवाहन केले होते. पुण्यातीलच राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी यांच्यासोबत सहकार्य करणार असल्याचे, सी-डॅकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

२) आयआयटी - 
दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) सुपरकंप्युटरचा एक कोटी किमतीचा वेळ कोविडच्या संशोधनासाठी उपलब्ध करून दिला आहे. यासंबंधी संशोधनाचे प्रस्तावही आयआयटीच्या वतीने मागविण्यात आले होते, अशी माहिती आयआयटीचे संचालक प्रा. व्ही.रामगोपालराव यांनी दिली आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे - 
- विषाणू, प्रथिने किंवा रसायनांचे स्ट्रक्‍चर समजण्यासाठी एक्‍सरे क्रिस्टोलोग्राफी किंवा न्यूक्लिअर मॅग्नॅटीक रेझोनन्स अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. परंतु, एआयच्या माध्यमातून उपलब्ध डेटाच्या आधारे सिम्युलेशनच्या सहाय्याने हे प्राप्त करता येते. 
- नक्की औषध शोधण्यासाठी मानवी पेशी किंवा विषाणूवरील टार्गेट काय आहे आणि आपले रसायन त्यावर कार्य करते याते सिम्युलेशनद्वारे माहिती मिळवता येते. 
- प्रत्येक प्रयोगासाठी प्रत्यक्ष सजिवांचा किंवा प्रयोगशाळेतील संसाधनांचा वापर करण्याची आवश्‍यकता नाही. 
- विषाणूच्या जणूकीय साखळी बरोबरच त्यात होणारे बदलही अभ्यासता येतात. 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कोरोना बाधितांचा शोध घेणे आणि संभाव्य धोका असलेल्या नागरिकांना विलग करणे शक्‍य आहे. लाखो रासायनांची पडताळनी करून औषधासाठी योग्य रसायनाची निवड करण्याची प्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जलद झाली आहे. सीएसआयआर सोबत एआयसीटी आणि देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. 
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर. 

औषधे किंवा लसीच्या अंतिम चाचण्यांसाठी प्रत्यक्ष शरीरातील वातावरणाची आवश्‍यक असते. अतिशय जटिल असलेल्या शरीरातील ही सुविधा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात काही मर्यादा येतात. असे जरी असले तरी, सिम्युलेशनच्या माध्यमातून रसायने किंवा विषाणूंची कार्यपद्धती अधिक अचूकतेने आणि वेळेची बचत करत तपासता येते. 
- प्रा. अरविंद नातू,ज्येष्ठ वैज्ञानिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com