चित्रकार गणेश पोखरकर यांच्या कलाकृतीला जहांगीर सबावाला पुरस्कार

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र देवून गौरव

मंचर (पुणे): पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील प्रसिद्ध चित्रकार गणेश दत्तात्रेय पोखरकर (वय ३०) यांना मुंबई येथील प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कलानंद आर्टस कॉन्टेस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या कलाकृतीची दखल घेऊन त्यांना देश पातळीवरील मानाचा समजला जाणारा ‘जहांगीर सबावाला पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले.

एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र देवून गौरव

मंचर (पुणे): पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील प्रसिद्ध चित्रकार गणेश दत्तात्रेय पोखरकर (वय ३०) यांना मुंबई येथील प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कलानंद आर्टस कॉन्टेस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या कलाकृतीची दखल घेऊन त्यांना देश पातळीवरील मानाचा समजला जाणारा ‘जहांगीर सबावाला पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले.

मुंबई येथे नेहरू सेंटर वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रफुल्ल डहाणुकर आर्ट फाऊंडेशनचे विश्वस्त रवींद्र साळवी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र देवून गणेश पोखरकर यांना गौरविण्यात आले. त्यांनी सहा बाय सहा फुट आकाराचे सीटी स्केप हे तैलरंग साकारले आहे. ते जयपूर शहराची कलाकृती आहे. उंचावरून शहरे नजरेला कशी दिसतात हा चित्राचा विषय आहे. या चित्रासाठी त्यांना तीन महिन्यांचा कालावधी लागला. ब्रशने रंग न लावता नाईपच्या (चमचा) सहाय्याने रंग लावलेला आहे. पिंपळगावचे नाव देशपातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे.

पोखरकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयात व फाईन आर्टची पदवी त्यांनी भारती विद्यापीठ (धनकवडी-पुणे) येथून घेतली आहे. इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असताना वडील दत्तात्रेय यांचे छत्र हरपले. आई कांताबाई दत्तात्रेय पोखरकर, थोरली बहिण अनिता संजय हिंगे, ललिता किसन गांजवे, भाऊ दिनेश दत्तात्रेय पोखरकर याचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे चुलते निवृत्ती रभाजी पोखरकर यांची शिक्षणासाठी मदत मिळाली. मित्र सचिन बांगर, बांधकाम व्यावसायिक संदीप बांगर यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाले.

पुण्याच्या मंडईचे चित्र रेखाटले होते. ब्रशने रंग न लावता नाईपच्या (चमचा) सहाय्याने रंग लावलेला होता. अनेकांनी चित्राचे कौतुक केले. मी काढलेल्या पहिल्या चित्राची खरेदी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली. तेव्हा पासूनच मला खऱ्या अर्थाने प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. असे चित्रकार गणेश पोखरकर यांनी सांगितले.

प्रदर्शन सर्वांसाठी खुले...
'गेली तीन वर्ष नवीन कलाकृतीसाठी मेहनत घेतली आहे. उंचावरून पॅरीस, मुंबई, बॅगलोर, नवी दिल्ली आदी शहर कशी दिसतात. हे कलाकृतीतून साकारले आहे. ता. १९ जून ते २५ जून जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा चौक, फोर्ट मुंबई येथे कलाकृतीचे भरविण्यात येणार आहे. यामध्ये अनेक कलाकृती पाहण्याचा आनंद कलारसिकांना मिळणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवले,’ अशी माहिती प्रसिद्ध चित्रकार गणेश पोखरकर यांनी दिली.

एकूण एक लाख वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती
अनेक जागतिक दर्जाच्या कलाकृती व पेंटींग्ज घडवत अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. दोन वर्ष त्यांनी काढलेल्या कलाकृतीला केंद्रीय सरकारच्या ललित कला केंद्रामार्फत एकूण एक लाख वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.    

Web Title: artist ganesh pokharkar got jehangir sabavala award