‘व्हेजमार्ट’मधून सेंद्रिय मालाला डिजिटल बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सेंद्रिय शेती करणाऱ्या पाचशे शेतकऱ्यांना एकत्र करून ‘व्हेजमार्ट’ स्टार्टअपच्या माध्यमातून ऑनलाइन डिजिटल शहरी बाजारपेठ मिळवून देणारे ‘व्हेजमार्ट’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अशोक पाटील यांच्याशी साधलेला संवाद -

प्रश्‍न - ‘व्हेजमार्ट’ स्टार्टअपची संकल्पना कशी सुचली? याची वैशिष्ट्ये काय?
अशोक पाटील - मला काही वर्षांपूर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. शरीरावर घातक परिणाम करणारी रासायनिक खते, कीटकनाशके कर्करोगाला कारणीभूत असल्याचे समजले. त्यानंतर औषधोपचाराने मी कर्करोगावर मात केली. मात्र शेणखत, कंपोस्ट खतांवर शेती करण्यात यापुढील आयुष्य घालवायचे, असे ठरविले. त्यानंतर २०१५मध्ये ‘व्हेजमार्ट’ हे संकेतस्थळ आणि ॲपच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती करणाऱ्या पाचशे शेतकऱ्यांना एकत्र करून पालेभाज्या, फळभाज्या, मसाले, दूध आदींच्या विक्रीसाठी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध केली. एक किलो ते पाचशे किलोपर्यंतचा शेतातील माल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविणे हे आमचे वैशिष्ट्य आहे.

सेंद्रिय शेती नेमकी कशी केली जाते आणि कोणकोणती उत्पादने ‘व्हेजमार्ट’द्वारे विकली जातात?
सेंद्रिय शेती म्हणजे कृत्रिम रासायनिक खतांऐवजी गोमूत्र, शेणखत, कंपोस्ट खत, दशपर्णी अर्क, जीवामृत यांच्या वापरातून शेतीतील उत्पादन आणि संरक्षण करणे होय. ‘व्हेजमार्ट’च्या माध्यमातून सर्व पालेभाज्या, फळभाज्या, डाळिंब, चिकू, सीताफळ, लिंबू, पपई, केळी, देशी गीर गायीचे दूध अशी उत्पादने विकली जातात.

‘व्हेजमार्ट’च्या शेतकऱ्यांची किती जमीन उत्पादनाखाली आहे?
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील पाचशे शेतकऱ्यांची एक हजार एकर जमीन ‘व्हेजमार्ट’च्या अंतर्गत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, अकोला येथील ग्राहक जोडले गेले आहेत. ‘नोका’ आणि ‘इकोसर्ट’ची प्रमाणपत्रे असलेले शेतकरी ‘व्हेजमार्ट’मध्ये सभासद आहेत. 

‘व्हेजमार्ट’च्या अन्य सुविधा कोणत्या आहेत?
पालेभाज्या, फळभाज्या, देशी गायीचे दूध याशिवाय मसाले, सुकामेवा, विविध प्रकारच्या धान्यांचे पीठ, आरोग्य पेये हेदेखील ऑनलाइन, फोनद्वारे किंवा संकेतस्थळावर नोंदणी आणि ई पेमेंटद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

Web Title: ashok patil interview vegmart startup