शिरूरमध्ये "राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात ;  अशोक पवार विजयी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कार्यकर्त्यांच्या भरवशावर लावलेली "फिल्डिंग' आणि वैयक्तिक प्रभावाबरोबरच; कामसू व अभ्यासू ही प्रतिमा नवमतदारांच्या मनावर ठसवत नेत्रदीपक विजय साकारून, अशोक पवार यांनी अखेर "राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला. 

शिरूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीतील पराभवातून धडा घेत लावलेली तडाखेबंद यंत्रणा, अनेक स्थानिक नेते पक्षाला सोडून गेल्याने अधिक सावध होत, सामान्य पण दिलेर कार्यकर्त्यांच्या भरवशावर लावलेली "फिल्डिंग' आणि वैयक्तिक प्रभावाबरोबरच; कामसू व अभ्यासू ही प्रतिमा नवमतदारांच्या मनावर ठसवत नेत्रदीपक विजय साकारून, अशोक पवार यांनी अखेर "राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला. 
 
शिरूर - हवेलीत एकहाती पकड 
ही निवडणूक जाहीर झाल्यापासून नव्हे; तर मागील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याच्या क्षणापासून पवार यांनी "पुन्हा लढणार आणि जिंकणार' असा जणू प्रणच केला होता. त्यादृष्टीनेच त्यांचे गेल्या विधान सभेनंतरच्या सर्व निवडणुकांतील सूक्ष्म नियोजन होते. पक्षीय निर्णय प्रक्रियेत इतरांना हस्तक्षेप करू न देता त्यांनी शिरूर - हवेलीतील पक्षप्रक्रियेवर एकहाती पकड ठेवली. स्वतःच्या मर्जीप्रमाणे, नियोजन करून सर्व सूत्रे स्वतःच्या हाती ठेवत जिल्हा परिषद, पंचायत समिती, घोडगंगा कारखाना, बाजार समिती या व इतर निवडणुकामध्ये पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यातून त्यांचा मोठा प्रभाव निर्माण झाला जो त्यांना या निवडणुकीत उमेदवारीबरोबरच विजयाकडे घेऊन गेला. 
 
भरीव कामे सामान्यांना भावली 
मागील पराभवातून सावरताना पवार यांनी अत्यंत गांभीर्याने "सर्वतोपरी' खबरदारी घेतली. घोडगंगा साखर कारखान्यावर आरोप होऊनही त्यांनी सभासदांना विश्‍वासात घेतले, त्यांची मते विचलित न झाल्याचा मोठा फायदा पवारांना झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार व अजितदादांच्या सभांमुळे झालेल्या वातावरण निर्मितीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघातील सभा व रोड शोने कळस चढवला. डॉ. कोल्हे यांच्या विजयात योगदान देणाऱ्या पवारांनी त्यांच्या प्रतिमेचा अत्यंत खुबीने वापर करून घेतला. नवमतदारांत त्यामुळे चैतन्य सळसळले. आक्रमक स्वभाव, मागील पराभवानंतरही मतदार संघात झंझावाताने निर्माण केलेली पकड, कारखान्यासह इतर संस्थांवरील निर्विवाद वर्चस्व याबरोबरच; 2009 ते 14 या काळात आमदारकीच्या माध्यमातून केलेली नावीन्यपूर्ण, रचनात्मक, भरीव कामे जनतेसमोर मांडली जी सामान्यांना भावली. 
 
पदाधिकाऱ्यांचे अलिप्त धोरण पाचर्णेंना भोवले 
भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी तीन हजार कोटींच्या विकासकामांचा दावा केला होता. ही कामे कागदोपत्री असून, विकासकामांचा दावा फुसका असल्याचे "राष्ट्रवादी'ने व विशेषतः अशोक पवार यांनी प्रभावीपणे मतदारांवर ठसवले. संपर्काचा अभाव, निष्क्रिय हे विरोधकांचे आरोपही पाचर्णे खोडू शकले नाहीत. मोठे नेते पक्षात आल्याने अतिआत्मविश्‍वास वाढला जो घात करणारा ठरला. नेत्यांच्या कोंडाळ्यात अडकल्याने संघटना खिळखिळी झाली व सामान्यांशी असलेली नाळ तुटली, जी त्यांना पराभवाकडे घेऊन गेली. शिवसैनिक त्वेषाने लढले; परंतु पदाधिकाऱ्यांचे अलिप्त धोरण पाचर्णेंना काही अशी भोवले. चासकमान पाणीवाटपाच्या अनियोजनामुळे शेतीचे झालेले कोट्यवधींचे नुकसान, प्रशासनातील ढिलाई, वाळूमाफियांशी संबंध, सातबाराचा धंदा यावरून उठलेला आवाज ते शांत करू शकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Pawar won from Shirur assembly constituency