Video: 'प्लास्टिक बँक'मुळे सोसायट्या होताहेत साफ; 'पुणे प्लॉगर्स'ची अनोखी मोहीम

अक्षता पवार
Saturday, 17 October 2020

- सोसायटीतील नागरिकांच्या प्लास्टिक कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पर्याय
- संकलित प्लास्टिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून सोसायटी करिता बेंच व इतर साधनात रूपांतर

पुणे : आयटी कंपनीत काम करणारा पुण्यातील 24 वर्षीय युवक विवेक गुरव याने प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनासाठी 'प्लास्टिक बँक' या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळं करण्याची शिस्त लागावी, तसेच प्लास्टिक कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याच्या हेतूने शहरातील विविध सोसायटींमध्ये याची सुरुवात नुकतीच करण्यात आली.

'फी'न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखताय? शिक्षण विभागाचा शाळांना कडक इशारा

प्लास्टिक बँकबाबत विवेक म्हणाले, ''प्लास्टिक कचरा हा सध्या पर्यावरणातील प्रदूषणाचा मोठा घटक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये घरगुती प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने यावर पर्याय म्हणून 'पुणे प्लॉगर्स' संस्थेची स्थापना केली व दर आठवड्याला शहरातील विविध भागांतील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी 'प्लास्टिक प्लॉगिंग'ची मोहीम सुरु केली. तेव्हा असं लक्षात आले की बहुतांश कचरा हा रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचा आहे. तसेच हा कचरा घरातील ओल्या कचऱ्याबरोबर तसाच टाकण्यात येतो. त्यामुळे प्लॉगिंग दरम्यान जमा केलेल्या कचऱ्याला स्वच्छ करून ते सुकवून प्रक्रियेसाठी पाठवण्यात वेळ जात असे. अश्यात प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातूनच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केले, तर प्लास्टिक संकलन आणखीन सोपे होईल. यासाठी सोसायटींमध्ये प्लास्टिक बँकची स्थापना केली. तर घरात तयार होणारा प्लास्टिक कचरा योग्य पद्धतीने कसा वेगळा करावा आणि तो धुवून, सुकवून कचऱ्यात टाकावा ही माहिती सोसायटींमधील नागरिकांना देण्याचे कार्य दक्षेष पाटील करतोय. यामुळे सध्या लोकांच्या सवयीमध्ये बदल होत असल्याचे दिसत आहे."

प्रेमाचं नाटक करुन फसवलं; गर्लफ्रेन्ड आणि बाळाला सोडून बॉयफ्रेन्डने काढला पळ

"आम्ही ओल्या कचऱ्यावर घरीच प्रक्रिया करत कम्पोस्ट खत तयार करत होतो. आमच्यासाठी मोठी अडचण होती ती म्हणजेच सुक्या कचऱ्याची. काचेचे ग्लास, कप, प्लास्टिकचे प्लेट, धान्य आणि इतर गोष्टींचे प्लास्टिक पॅकेट तो ही बऱ्याचवेळी ओल्या कचऱ्यात जात होता. त्यामुळे कचरा वेचकांशीही वाद होत असे. मात्र, आमच्या सोसायटीमध्ये या प्लास्टिक बँकची सुरुवात झाल्यापासून तो प्रश्नही मिटला आहे," असे कोथरूड येथील अलंकापुरी सोसायटीतील रहिवासी आणि अभियंता अंजली सिंगम यांनी सांगितले.

"प्लास्टिक बँकमध्ये प्लास्टिक कचरा टाकताना तो नेमका कसा असावा हे समजावून सांगतो. जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या बदल्यात आम्ही त्या त्या सोसायटींना पर्यावरणपूरक साधने देण्याचे कार्य करतो. जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून बेंच, कचऱ्याचे डबे, टेबल अशा वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करतो."
- दक्षेष पाटील, स्वयंसेवक - पुणे प्लॉगर्स

उपक्रमाअंतर्गत
- सध्या सहा सोसायटींमध्ये हा उपक्रम सुरू आहे.
- लॉकडाऊनच्या काळापासून सुमारे 480 किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

सोसायटीला मिळते ही सुविधा :
- प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात सोसायटींमध्ये रोपे लावणे.
- प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेतून तयार केलेले बेंच आणि कचऱ्याचे डबे सोसायटींना देणे.
- पुनर्प्रक्रिया करून तयार केलेली स्टेशनरी देणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Gurav from Pune has started Plastic Bank for plastic waste collection