

गुवाहाटी, ता. ६ : आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, राज्यातील १४ जिल्ह्यांमधील १.६ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ९५ वर पोचली असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी सहा मृत्यूंची नोंद झाली असून, यामध्ये शिवसागर आणि विश्वनाथ जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, तर गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
विश्वनाथ, चराईदेव, दर्रांग, धेमाजी, गोलाघाट, जोरहाट, कामरूप महानगर, कार्बी आंगलाँग, लखिमपूर, नागाव, शिवसागर, सोनितपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी या १४ जिल्ह्यांमधील १,६०,६०० हून अधिक नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. यामध्ये शिवसागरमधील ५७ हजार गोलाघाटमधील ३४ हजार आणि जोरहाटमधील २५ हजार नागरिकांचा समावेश आहे. तसेच १६,९५१.७६ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला. पुरामुळे झालेले नुकसान इतके मोठे आहे की, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नड्डा यांनी आसाम-नागालँड सीमेवरील शिवसागर जिल्ह्यातील नेपाळीखुटी भागाचा दौरा केला. पुराचा या भागाला मोठा फटका बसला आहे.
नड्डा यांनी सायंकाळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी पूरस्थिती, मदतकार्य, पुनर्वसन आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर नड्डा म्हणाले की, मी मुख्यमंत्री सरमा यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नुकसानीचे स्वरूप मोठे असून परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्ह्यांनुसार मृत्यू
शिवसागर ५०
चराईदेव २१
जोरहाट ९
गोलाघाट ५
धेमाजी ३
कार्बी आंगलाँग २
एकूण मदत छावण्या
१००
मदत छावण्यांतील नागरिक
४४,५२३
उत्तराखंडात नद्या धोक्याच्या पातळीवर
डेहराडून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अलकनंदा, मंदाकिनी आणि भागीरथीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असून, तीन जिल्ह्यांमधील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लाऊडस्पीकरद्वारे आवाहन करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. चमोली जिल्ह्यातील हेलंगजवळ ढिगारा आल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धरासू नालुपाणीजवळ गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच सतत दरडी कोसळल्याने यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग सिलाई बँड, दुर्बिल, जंगलचट्टी आणि सायनाचट्टी येथे बंद झाला आहे. हवामान खात्याने डेहराडून, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.