फक्त हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून जबर मारहाण

Marhan
Marhan

लोणी काळभोर (पुणे) : नगर जिल्ह्यातील शिवाजीराव नारायण नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा पृथ्वीराज नागवडे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या जमावाने जबर मारहाण केली. पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट नाक्‍यावर ही घटना घडली.

या प्रकरणी पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (वय 25, रा. वांगदरी ता. श्रीगोंदा, नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी मांजरी बुद्रुक (ता. हवेली) हद्दीतील मांजरी फार्म परिसरातील नीलेश दिवेकर, सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे यांच्यासह दहा अनोळखी तरुणांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.

पृथ्वीराज नागवडे व त्यांचे दोन मित्र योगेश भोईटे व मनीष जाधव हे शनिवारी रात्री आठच्या सुमारास हडपसरहून लोणी काळभोरमार्गे श्रीगोंदा येथे जाण्यासाठी दोन चारचाकी वाहनातून निघाले होते. पृथ्वीराज नागवडे यांची चारचाकी पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी ग्रीन चौकात आली असता त्याच्या चारचाकीला नीलेश दिवेकर चालवत असलेली मोटरसायकल आडवी आली. मोटारसायकल आडवी आल्याने पृथ्वीराज नागवडे यांनी हॉर्न वाजविला. हॉर्नचा आवाज येताच, नीलेश दिवेकर याने मोटारसायकल थांबवून, नागवडे यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या योगेश भोईटे व मनीष जाधव या दोन मित्रांनी, नागवडे यांना समजावून गाडीत बसण्याची विनंती केली. यावर नागवडे हे चारचाकी बसत असतानाच, नीलेश दिवेकर याने नागवडे यांना आमच्या एरियात आम्हाला नडतोस का असे म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दिवेकर व नागवडे यांच्यातील वाद पाहून स्थानिक नागरिक जमा होऊ लागल्याने, नागवडे आपल्या वाहनात बसून लोणी काळभोरबाजूकडे वेगात निघून जाऊ लागले. त्याचवेळी दिवेकर याने आपल्या काही मित्रांच्या साह्याने नागवडे याच्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरवात केली. नागवडे यांचे वाहन कवडीपाट टोलनाक्‍यावर पोचताच मागून सात ते आठ मोटारसायकलवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या जमावाने नागवडे यांची चारचाकी फोडली. तसेच रॉड, पट्टे व लाकडी दांड्यांच्या साह्याने नागवडे यांना बेदम मारहाण केली. नागवडे यांना जमावाच्या तावडीतून सोडविण्यासाठी आलेल्या योगेश भोईटे व मनीष जाधव या दोघांनाही दिवेकर व त्याच्या वरील मित्रांनी धक्काबुक्की केली.

पोलिसांनीही अरेरावी करण्याचा प्रयत्न
मारहाणीचा प्रकार लोणी काळभोर पोलिसांना समजताच, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी नागवडे व त्याच्या दोन मित्रांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांनीही अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी नागवडे व त्याच्या सहकाऱ्यांना घटनास्थळावरून हलविले. त्यानंतर रात्री उशिरा नागवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी नीलेश दिवेकर व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com