सहायक पोलिस निरीक्षक घोडे पाटील निलंबित तर पोलिस नाईक हांडे बडतर्फ

रवींद्र पाटे
Wednesday, 12 August 2020

सहायक पोलीस निरीक्षक घोडे पाटील निलंबित तर पोलीस नाईक हांडे बडतर्फ: पोलिस अधीक्षक  पाटील यांची तडकाफडकी कारवाई.
 

नारायणगाव : पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील (वय ३८) यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे (वय ३७) यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बाबत माहिती अशी, येथील पोलीस स्टेशनमध्ये बोरी येथील व्यक्तीवर सावकारकीच्या पैशातुन केलेल्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.अपहरणाच्या गुन्हयात मदत करण्यासाठी, न्यायालयात लवकर  दोषारोपपत्र सादर करण्यासाठी तसेच  गुन्हयातील दोन आरोपीना अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक हांडे यांनी ७ ऑगस्ट २०२० रोजी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या  लाचेची मागणी केली होती. या संदर्भात  तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दाखल केली होती. त्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांनी  नारायणगाव येथे सापळा लावला होता.

मात्र हांडे हे पैसे स्वीकारण्यासाठी आले नाहीत. तक्रारदारा सोबत  घोडे पाटील व हांडे यांच्या मोबाईलवरून झालेल्या संभाषनावरून पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी ११ ऑगस्ट २०२० रोजी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घोडे पाटील  व हांडे याना अटक केली होती.आरोपींना आज(ता.१२)  खेड न्यायालयात हजर केले असता १ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहीती  पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

दरम्यान, या घटनेची पोलिस अधीक्षक पाटील यांनी तातडीने दखल घेऊन घोडे पाटील यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.तर शिस्तभंगाविषयी कार्यवाही अंतर्गत  पोलीस नाईक  हांडे यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. लाच प्रकरणी घोडे पाटील यांच्यावरील कारवाईच्या माध्यमातून नारायणगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यावर झालेली ही निलंबनाची पहिलीच कारवाई आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Police Inspector Ghode Patil suspended