वयाच्या सातव्या वर्षी देशना नाहरची ‘गिनिज बुक’मध्ये नोंद

१३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग करत अंतर पूर्ण
Deshna Nahar
Deshna NaharSakal

पुणे - कुठल्याही गोष्टीची आवड माणसात जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची उमेद निर्माण करत असते, याचा प्रत्यय देशना नहार हिच्या भुवया उंचावणाऱ्या कामगिरीने येतो. वयाच्या केवळ सात वर्षाच्या देशना नहार हिने 'लिंबो स्केटिंग' या प्रकारामध्ये ‘गीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले आहे. तिने केवळ १३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून १९३ फूट अंतर स्केटिंग करत पूर्ण केले आहे. तिची ही कामगिरी तिच्या पालकांसह देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

आव्हानांना स्वीकारायचे ठरवले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे देशना नाहरची स्केटिंगमधील जागतिक विक्रमाची नोंद. 'लिंबो स्केटिंग' हा प्रकार अत्यंत अवघड आहे. गाड्यांच्या खालून स्केटिंग करताना अनेकवेळा देशनाच्या डोक्याला बारीक सारीक इजा झाल्या. पण देशनाने हार मानली नाही. सातत्याने सराव करून देशनाने यश मिळविले आहे. देशनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव आणि खडतर मेहनत पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.

बांधकाम व्यावसायिक आदित्य रसिकलाल नहार यांची ती मुलगी आहे. या चिमुकल्या तरबेज खेळाडूला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. देशना ही पुणे येथील हचींग स्कुलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नाहर यांनीही अथक परिश्रम घेतले आहे. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगचा सराव

  • १३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग करत अंतर पूर्ण

  • दोन वर्ष दररोज दोन तास सराव

  • यासाठी विविध प्रकारचा दररोज व्यायाम

  • सराव करताना अनेकदा दुखापत

८१ तासात १० हजार ११६ फेऱ्या मारत नऊ विक्रम

कर्नाटक येथे बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब व रोट्रॅक्ट क्लब बेळगाव साउथमध्ये ८१ तासात १० हजार ११६ फेऱ्या मारत स्केटिंगमध्ये एकचवेळी नऊ प्रकारचे वेगवेगळे विक्रम केले आहेत.

आजपर्यंत केलेलं विक्रम

जीनियस इंडीयन अचिव्हर्स आवार्ड, इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड बुक, इंडियन यंग बुक ऑफ रेकॉर्ड, बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड, ग्लोबल बुक रेकॉर्ड, नॅशनल बुक रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड, बेस्ट ऑफ एशिया रेकॉर्ड, चिल्ड्रन बुक रेकॉर्ड, एक्सट्रिम बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्डस् इंडीया.

देशनाला खेळाची आवड आहे. ती यासाठी खूप मेहनत घेते. मागील दोन वर्षांपासून ती मेहनत घेत होती. तिच्या या खेळातून तिने अनेकदा अंगावर काटा आणणारे अनुभव दिले आहेत. पालक म्हणून जशी काळजी घेतली तसे प्रोत्साहन सुद्धा दिले. तिचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तिच्या आजीने खूप मेहनत घेतली. यापुढे जागतिक पातळीवर वेगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ती तयार आहे. तिच्या स्वप्नांना पालक म्हणून नेहमीच पाठिंबा देणार.

- आदित्य नाहर, देशनाचे वडील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com