‘कॅश’ असणारे एटीएम लगेच कळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

एटीएम कार्यान्वित आहेत किंवा नाहीत याबाबतची काही माहिती बॅंकांकडून घेण्यात आली आहे; मात्र सध्याच्या परिस्थिती बघता, युझर्सकडूनही याबाबत माहिती संकलित करून अधिकाधिक अचूकपणे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- सुनील जैन

इंडिया फाइंड बॅंकेचा उपक्रम; संकेतस्थळावर माहिती उपलब्ध 

पुणे - चलन बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘इंडिया फाइंड बॅंक’ (https://indiafindbank.in/) या संकेतस्थळावरही आता देशभरातील कोणत्या एटीएममध्ये ‘कॅश’ उपलब्ध आहे किंवा नाही, याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. 

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर शंभर रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे; मात्र सुरवातीचे काही दिवस शंभर रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी असल्यामुळे शहरातील बहुतांश एटीएम हे ‘आउट ऑफ कॅश’ झाले आहेत. शहरातील सर्वच एटीएम बंद किंवा चालू असतील असे नसते. तुमच्या घर किंवा कार्यालयाजवळचे माहिती असलेले एटीएम जरी बंद असले, तरी शेजारच्या गल्लीतील एटीएम चालू असू शकते; मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत पोचणार कशी? ही अडचण असते. ती दूर करण्यासाठी या संकेतस्थळाची मदत होत आहे. 

दैनंदिन जीवनात तुम्ही प्रवास करत असलेल्या कोणत्याही भागात किंवा रस्त्यावर एटीएम दिसल्यास केवळ एक मिनीट थांबून संकेतस्थळाला भेट द्या. त्या भागात किंवा रस्त्यावर असलेल्या ‘एटीएम’मध्ये कॅश काढता येत आहे किंवा नाही, याची माहिती संकेतस्थळाला पाठवा. इंडिया फाइंड बॅंकेने हा ‘नॉट प्रॉफिट’ तत्त्वावर सुरू केलेला उपक्रम असल्यामुळे तुमचे केवळ एक मिनीट हे इतर नागरिकांचा मोठा वेळ वाचवू शकते. 

लोकेशन तीन रंगांमध्ये 
संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला बॅंक किंवा एटीएम शोधण्याचा पर्याय उपलब्ध आहे. समजा एटीएमवर क्‍लिक केल्यास तुम्हाला पाहिजे असलेल्या भागावर ‘झूम’ केल्यानंतर तेथील सर्व एटीएमचे लोकेशन तीन रंगांमध्ये दर्शविण्यात येते. कॅश उपलब्ध आहे, नाही आणि माहिती नाही, या तीन पर्यायांसाठी हिरवा, लाल आणि राखाडी रंगाचा वापर करण्यात आला आहे.

Web Title: ATM immediately clear that cash