तळेगाव परिसरात एटीएम केंद्रांची सुरक्षा ‘रामभरोसे’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

खातेदारांना सोईप्रमाणे पैसे काढण्याची सुविधा पुरविणाऱ्या एटीएम केंद्रांच्या सुरक्षेकडे बॅंकाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. परिसरातील बहुतांश एटीएमला पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने बॅंकांच्या निष्काळजीपणापायी संभाव्य चोऱ्यांची धास्ती पोलिसांना आहे.

तळेगाव स्टेशन - खातेदारांना सोईप्रमाणे पैसे काढण्याची सुविधा पुरविणाऱ्या एटीएम केंद्रांच्या सुरक्षेकडे बॅंकाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. परिसरातील बहुतांश एटीएमला पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने बॅंकांच्या निष्काळजीपणापायी संभाव्य चोऱ्यांची धास्ती पोलिसांना आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत स्टेशन, गावठाण, सोमाटणे, माळवाडी, वराळे, एमआयडीसी मिळून राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांचे पन्नासपेक्षा अधिक एटीएम केंद्रे आहेत. बॅंकेला जोडून असलेले आणि पेट्रोल पंपावरील एटीएम केंद्र सोडले तर इतर बहुतांश ठिकाणी एटीएम केंद्रांवर सुरक्षेसाठी सायरन, सेन्सर, सुरक्षारक्षक यासारख्या उपाययोजना दिसत नाहीत. कमी पगारात ठेवलेले सुरक्षारक्षक वयस्कर आहेत.

चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....

बहुतांश सुरक्षारक्षक केवळ सोपस्कार म्हणून तासंनतास बसून किंवा निद्रावस्थेत आढळतात. एकंदरीत बॅंकांच्या निष्काळजीपणामुळे तळेगाव परिसरातील बहुतांश एटीएम केंद्रांची सुरक्षा ‘रामभरोसे’ आहे. ग्राहकांनी चुरगळून फेकलेल्या पेपरस्लीपच्या कचऱ्याने कुंड्या ओसंडून वाहताना दिसतात. काही ठिकाणी निकामी अलार्म आणि कॅमेऱ्यांच्या वायरची लक्तरे लोंबलेली पहायला मिळतात. एटीएम केंद्रात पुरेसा प्रकाश आणि स्वच्छता राखली जात नाही. एटीएम केंद्र बाहेरील एजन्सीकडून नियंत्रित केले जात असल्याने संबंधित बॅंकेच्या स्थानिक शाखेत तक्रार करून दखल घेतली जात नाही. याची धास्ती पोलिसांना लागली आहे. त्यामुळे रात्री बीट मार्शल पथकास प्रत्येक एटीएम केंद्रावर जाण्याशिवाय गत्यंतर नाही. बॅंकांनी एटीएम केंद्रावर सुरक्षेच्या किमान आवश्‍यक उपाययोजना केल्यास पोलिस यंत्रणेवरील संभाव्य तपासाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

अलार्म सिस्टीम बटण दाबल्यास पोलिस आणि बॅंकेला कॉल जातो. मात्र तो तीनवेळा अटेंड केला नाही, तर तो थेट पोलिस ठाण्यात जातो. चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात असतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिवसभरात दोन-तीन वेळा ऑडिट केले जाते.
- गौतम साळवे, सहायक व्यवस्थापक, येस बॅंक, तळेगाव शाखा

बॅंकांनी एटीएम केंद्रांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकू सोडू नये. किमान परस्परांशेजारी आणि जवळपास असलेल्या ठिकाणी संयुक्तिकपणे सक्षम सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याल बॅंका जबाबदार असतील. 
- अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM Security Issue in Talegav Area