‘एटीएम’ आठवडाभरात पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सुट्यांचा हंगाम असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिक ‘एटीएम’मधून मोठ्या प्रमाणात रोकड काढत आहेत. दरवर्षीच मार्च, एप्रिलमध्ये अशी परिस्थिती असते. पुढील आठवड्यापासून परिस्थिती पूर्वपदावर येईल.
- प्रशांत नाईक, सरव्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, पुणे विभाग

पुणे - शहरातील अनेक ‘एटीएम’मध्ये गेल्या काही दिवसांपासून खडखडाट आहे. याबाबत माहिती घेतली असता बॅंकांनी केलेल्या मागणीच्या केवळ चाळीस टक्‍क्‍यांपर्यंतच भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून चलन पुरवठा होत असल्याने ‘एटीएम’मध्ये भरायला पुरेशी रोकड नसल्याचे एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले; मात्र सोमवारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

बॅंकांच्या करन्सी चेस्टला मिळणाऱ्या रोकडमध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण घटले असून, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा आणि पाच रुपयांच्या नोटा आणि नाण्यांचे प्रमाण वाढले आहे; मात्र एटीएममधून फक्त दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्याच नोटा मिळण्याची सोय असल्याने पाच ते पन्नास रुपयांच्या नोटा बॅंकांच्या शाखांमध्येच पडून राहत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठीची मर्यादा उठविली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याने ‘एटीएम’ केंद्रांवरील रोकड लवकर संपत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या काही एटीएम केंद्रांवर नवीन मशिन बसविले जात असल्याने ती केंद्र बंद आहेत. आरबीआयच्या सूचनेनुसार सत्तर टक्के आर्थिक व्यवहार ‘एटीएम’द्वारे आणि तीस टक्के शाखा स्तरावर केले पाहिजेत. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

आयडीबीआय बॅंक (पुणे विभाग) सरव्यवस्थापक ब्रिजमोहन शर्मा म्हणाले, ‘‘आयडीबीआयची सर्व ‘एटीएम’ केंद्रे सुरू आहेत. दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण घटले असले, तरीही पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देत आहोत.’’

Web Title: ATM week rehabilitation

टॅग्स