न्यायालयाला फसवायला निघाला होता; किमोथेरपीचं बनावट प्रमाणपत्र केलं सादर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

निलेश सबवंत (वय 35, रा.अप्पर इंदिरानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ः न्यायालयातून जामीन मिळविण्यासाठी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगाराने थेट कर्करोगासाठी आवश्‍यक किमोथेरपी व सिटी स्कॅन करण्यासाठीचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याची शक्कल लढविली. मात्र हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर न्यायालयाचीच फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निलेश सबवंत (वय 35, रा.अप्पर इंदिरानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवंत हा सराईत गुन्हेगार आहे. जुन ते जुलै 2020 या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी व अन्य गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान, त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध "मोक्का'अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीस विशेष न्यायालयात हजर करण्यात येत होते. आरोपीने त्यास तत्काळ जामीन मिळावा, यासाठी चांगलीच शक्कल लढविली. त्याने साताऱ्यातील शेंद्रे येथील ऑनको लाईफ कॅन्सर सेंटरमधील डॉक्‍टरच्या लेटर हेडचा वापर केला. त्यामध्ये "संबंधीत रुग्णाला 4 किमोथेरपीची गरज असून सहा महिन्यांच्या साखळीमध्ये ती पुर्ण करायची आहे. पेट स्कॅनचा अहवालानुसार पुढील उपचार अवलंबून असतील,' असा उल्लेख करण्यात आला होता. जामीन मिळण्याच्या उद्देशाने त्याने संबंधीत वैद्यकीय प्रमाणपत्र शिवाजीनगर येथील मोक्काच्या विशेष न्यायालयाकडे सादर केले, न्यायालयाने संबंधीत पत्राची पाहणी केली, तेव्हा, त्यांना संबंधीत वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरोपीने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
---


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to defraud court by submitting fake chemotherapy certificate from Mcoca accused for bail