Pune : घरबसल्या सहभागी व्हा ‘विज्ञान महोत्सवात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

घरबसल्या सहभागी व्हा ‘विज्ञान महोत्सवात’

पुणे : देशातील सर्वात मोठा विज्ञानोत्सव भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) यंदा गोव्यात आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवड लोकांना जरी प्रत्यक्ष प्रवेश असला, तरी संपूर्ण महोत्सवाचे व्हर्च्युअल आयोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान प्रेमींना घरबसल्या महोत्सवात सहभागी होता येणार आहे.

पणजी येथे १० ते १३ डिसेंबरदरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, गोवा सरकार आणि विज्ञान भारतीच्या प्रयत्नातून हे आयोजन होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘विज्ञानातील सर्जनशीलतेला उत्सव’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन हा सातवा विज्ञान महोत्सव साजरा होत आहे. व्हर्च्युअल या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) यंदाचे यजमानपद भूषवीत आहे.

महोत्सवाचे आकर्षण

  1. आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव

  2. विज्ञान साहित्य परिषद

  3. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची परिषद

  4. विज्ञानग्राम

  5. पारंपारिक हस्तकला आणि कलाकारांची परिषद

  6. खेळ आणि खेळण्यांचा उत्सव

  7. शाश्वत विकासाचा ‘इकोफेस्ट’

  8. नवतंत्रज्ञानाचा उत्सव

  9. विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘एक्स्पो’

हेही वाचा: वन कार्यालयात आदिवासींचा ठिय्या; विहिरीसाठी मागितली परवानगी

कसे सहभागी व्हाल?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच महोत्सवाच्या ठिकाणी प्रवेश देणे शक्य नाही. त्यामुळे आयोजन समितीने व्हर्च्युअल नागरिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. https://www.scienceindiafest.org/register/ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर आपल्याला विविध कार्यक्रमांसाठी व्हर्च्युअल प्रवेश मिळणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विज्ञानाच्या सर्जनशीलतेचा उत्सव आयआयएसएफ २०२१च्या माध्यमातून साजरा होत आहे. सर्जनशील भारतीय मनांना वैविध्यपूर्ण संधी या विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. विज्ञानातील सर्वच आयामांना या महोत्सवाद्वारे स्पर्श करण्यात आला आहे.

- डॉ. विजय भटकर, राष्ट्रीय अध्यक्ष, विज्ञान भारती. (संदेशातील प्रतिक्रिया)

loading image
go to top