औंध रुग्णालयातील उपाहारगृह धूळ खात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नुकतीच घडलेली घटना पाहता येत्या काही दिवसांत उपाहारगृह चालविण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. पुढील तीन- चार महिन्यांत उपाहारगृह सुरू होण्यासाठी प्रयत्न करू.
- डॉ. रुद्राजी शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक

पिंपरी - मेट्रो रक्तपेढीप्रमाणे औंध येथील जिल्हा रुग्णालयासाठी बांधण्यात आलेले उपाहारगृह तब्बल पाच वर्षांपासून विनावापर पडून आहे.  

औंध रुग्णालय आवारातील रुग्णालय इमारतीसमोरील चहा-नाश्‍त्याची टपरी नुकतीच जळून खाक झाली. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र रुग्णालयाचे उपाहारगृह बांधून तयार असताना, ते चालविण्याबाबत प्रशासन उदासीन का? शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 

रुग्णालयातील रुग्णांना शासनातर्फे चहा, नाश्‍ता आणि जेवण दिले जाते. मात्र रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब आणि गरजू रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. नाइलाजास्तव त्यांच्या नातेवाइकांनाही रुग्णालयातच मुक्कामी राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचीही मोठी आबाळ होते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घेऊन रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) उपाहारगृह बांधण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रुग्णालय इमारतीलगतची मोकळी जागा दिली. बांधकाम विभागाकडून २०११ मध्ये प्रत्यक्ष बांधणीचे काम हाती घेतले गेले. तर नऊ ते दहा महिन्यांच्या मुदतीमध्ये म्हणजेच २०१२ मध्ये काम पूर्ण करून ते रुग्णालयाकडे हस्तांतरितही करण्यात आले. तथापि, आजही हे उपाहारगृह उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेतच आहे. ते सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही. उलट रुग्णालयाच्या औषधसाठ्यासाठी मोठे गोदाम असतानाही या नवीन उपहारगृहाचाही वापर औषधे व अन्य वैद्यकीय साधनसामग्री ठेवण्यासाठी केला जात आहे. 

आवारात टपऱ्यांची बजबजपुरी
रुग्णालय आवारात टपऱ्या, हातगाड्या लावण्यास परवानगी नाही. तरीदेखील, केवळ आवारातच नव्हे, तर रुग्णालय इमारतीच्या समोरच विविध प्रकारच्या हातगाड्या लावल्या जातात.

Web Title: Aundh hospital food restaurant