Aurangabad : हार-फुले कशाला... वही-पेन देऊ अभ्यासाला!

महामानवाला कृतीतून आदरांजली; गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरsakal

औरंगाबाद : चळवळ कुठलीही असो, त्यात काम करणारे सदस्य प्रामाणिक असतील तर चळवळीचे विधायक कार्य डोंगराएवढी उंची गाठू शकते हे सिद्ध केले आहे ‘फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट’ (फॅम) या चळवळीने. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी हार-फुले आणण्यापेक्षा ‘एक वही-एक पेन’ ही संकल्पना २०१५ मध्ये मुंबईतून सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ विविध राज्यांसह देशभरात पोहोचली आहे. या चळवळीतून उच्चशिक्षित तरुणांनी गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि शैक्षणिक साहित्य पुरवून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार कृतीतून पेरले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येकवर्षी मुंबईत चैत्यभूमी तसेच देशाच्या प्रत्येक शहरात आणि कानाकोपऱ्यात अनुयायी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात.

हार-फुलांचे दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते अन कचऱ्यात जाते. आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही बाब चिंताजनक आहे. सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. त्यातूनच या विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून ’एक वही एक पेन’ या संकल्पनेने जन्म घेतला.

प्रत्येक वर्षी राज्यातील विविध शहर आणि तालुक्यांमध्येही ही मोहीम राबवली जात आहेत. मोहिमेत गोळा झालेल्या वह्या, पेन आणि शालेय साहित्य आदिवासी तांड्या वाड्यांवरील शाळा, आश्रमशाळा, जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ‘फॅम’चे पदाधिकारी पार पाडत आहेत. गेल्या सात वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना यातून शैक्षणिक मदतीचा हात दिला आहे.

अशी झाली चळवळ सुरू

सोशल मीडियाच्या काळात ‘ऑर्कूट’चा अस्त होऊन भारतामध्ये ‘फेसबुक’चा उदय झाला होता. त्यावेळी फेसबुकवर नवीन पिढीचे आगमन सुरु झालेले होते. त्या प्रक्रियेतून जी चळवळ उभी राहिली तिचे नाव ‘फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट’ (फॅम) आहे.

मुंबईतून सुरु झालेली ही चळवळ पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पनवेल, कामोठे, चिपळूण, रायगड, नगर, बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, सांगली आदी ठिकाणी पोचली. महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि भारताबाहेर लंडन, दुबई येथे ‘फॅम’चे अनेक हितचिंतक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com