बदलांचा वेध घेत उत्पादननिर्मिती हवी - रवी कांत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे - वाहन उत्पादन क्षेत्रात उलथापालथ घडवू शकणारे बदल जगभरात होत आहेत. या बदलांचा सातत्याने वेध घेत आपली उत्पादने बनविण्याचे मोठे आव्हान या उद्योगापुढे आहे, असे मत टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी कांत यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

पुणे - वाहन उत्पादन क्षेत्रात उलथापालथ घडवू शकणारे बदल जगभरात होत आहेत. या बदलांचा सातत्याने वेध घेत आपली उत्पादने बनविण्याचे मोठे आव्हान या उद्योगापुढे आहे, असे मत टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी कांत यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

टाटा मोटर्सचे माजी उपाध्यक्ष श्रीधर जोशी यांनी लिहिलेल्या ‘ऑटो कम्पोनन्ट फेल्युअर ॲनॅलिसिस’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक (भारत विभाग) प्रकाश तेलंग, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘एआरएआय’च्या संचालिका रश्‍मी ऊर्ध्वरेषे, टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बोरवणकर, माजी कार्यकारी संचालक रवी पिशारोडी, पुस्तकाचे प्रकाशक व ‘इन्स्पायर मल्टिमीडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, व्हीएनआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी उपस्थित होते. 

कांत म्हणाले, ‘‘वाहन उद्योगाचा जगभर आणि देशात झपाट्याने विस्तार होत असून, वाहन तंत्रज्ञान प्रचंड गुंतागुंतीचे होत आहे. वाहनांमध्ये यांत्रिक सुट्या भागांची जागा इलेक्‍ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअर यंत्रणा घेत आहेत, याचा वाहनांची गुणवत्ता उत्तम ठेवताना विचार झाला पाहिजे.’’

पवार म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानातील बदल त्सुनामी लाटांसारख्या प्रचंड वेगाने आणि ताकदीने येत आहेत. त्यामुळे वाहनांमधील दोष शोधून काढून ते दुरुस्त करण्याबद्दलचा दृष्टिकोन मुळातून बदलावा लागेल. त्यामुळे बहुधा सुट्या भागांची गरजच लागणार नाही. जोशी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, या पुस्तकामुळे नवीन पिढीतील अभियंत्यांना ज्ञान प्राप्त होईल.’’  

या पुस्तकाचे हिंदी, तमीळ आणि बंगालीमध्ये भाषांतर होणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून जमा होणारा निधी कोलकाता येथील टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटरला देण्यात येणार आहे. प्रकाशन समारंभानिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘झेडएफ स्टीअरिंग गियर’चे वरिष्ठ अध्यक्ष चंद्रकांत डांगे, शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे प्रमुख 
डॉ. त्रिकल, ‘इटास’चे व्यवस्थापक हर्षवर्धन जोशी, ‘युनिडो’चे राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक के. चंद्रशेखर यांनी विचार मांडले.

 

Web Title: auto component failure analysis book publish ravi kant