रिक्षाचालक म्हणतात,`आम्ही व्यवसाय कधी करायचा`?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

हिंजवडी, भूमिकर वस्ती आणि आरटीओ येथील पंपांचे आधुनिकीकरण सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल. नरवीर तानाजी वाडी आणि गुलटेकडीतील पंपावर वाहतुकीच्या सोयीसाठी चार चाकी वाहनांना दिवसा सीएनजी दिला जात नाही. काही पंपांवर वाहतूक पोलिसांनी काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. रिक्षा आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र लाईन लावण्यास सांगितले आहे.

- संतोष सोनटक्के , वाणिज्य व्यवस्थापक, एमएनजीएल

पुणे :  पावसामुळे रस्त्यावर नागरिक कमी आहेत. त्यातच सीएनजीच्या रांगेतच दीड- दोन तास जातात. मग आम्ही व्यवसाय कसा करायचा ? गप्पा मोठ्या-मोठ्या मारल्या जातात. पण, "स्मार्ट सिटी'मध्ये कष्टकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही, अशी व्यथा शहरातील रिक्षाचालक, कॅब व्यावसायिकांनी गुरुवारी "सकाळ'कडे मांडली.

रिक्षा, कॅबसाठी "सीएनजी' मिळत नाही अन्‌ त्यासाठी रांगेत दीड-दोन तास घालवावे लागतात, अशी त्यांची तक्रार आहे. पण, सोडवणूक होत नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

- नरवीर तानाजीवाडीमध्ये रांगेत दीड- दोन तास थांबावे लागते. पंपांचे कर्मचारी 50 रुपये घेऊन, मध्येच कोणालाही नंबर देतात. त्यामुळे किती भांडायचे ? सहा- सात तासांत पुरेसा व्यवसायही होत नाही. जीव अक्षरशः रडकुंडीला आला आहे.

जीवन धुमाळ ,  रिक्षाचालक

सीनएजीवरील गाड्यांची संख्या वाढत आहे. पण, पंप का नाही वाढत ? कोणत्याही पंपावर गेलो तरी रांगाच असतात. त्यातच वाहतूक पोलिसही आता वाहतुकीच्या नावाखाली पंप बंद करण्यास भाग पाडत आहेत.

- अर्जुन शिंदे,  रिक्षाचालक

शहरातील अनेक सीएनजी पंपांवर रिक्षांच्याच रांगेत आता कॅब उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे दोन तास जाऊ लागले आहेत. काही पंपांवर तर, चार चाकी गाड्यांना सीएनजी मिळत नाही. त्यामुळे आता गाड्या कशा चालवायच्या ? या पंपांची संख्या वाढली पाहिजे.

-उदय पानसरे,  कॅबचालक

 

- शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सीएनजी पंपांची संख्या ः 69
- शहरातील सीएनजीचा रोजचा खप ः 4. 5. लाख किलोग्रॅम
- शहर व परिसरातील सीएनजीवरील वाहनांची एकूण संख्या ः दोन लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auto drivers is in tension about CNG issue