शेतकरी पुत्राची गरुडभरारी, नोकरीवर पाणी सोडून जिंकली कलेक्टरपदाची शर्यत 

राजकुमार थोरात
Friday, 4 September 2020

अविनाश शिंदे यांचे कुटुंब इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पवारवाडी गावामध्ये शेती व्यवसाय करीत आहे. अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण पवारवाडी येथील प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण मानकरवाडीमधील श्री छत्रपती हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील अविनाश संजीवन शिंदे या शेतकरी कुटुंबातील तरुणाने केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले असून, आयएएस पदासाठी त्यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अविनाश शिंदे यांचा सत्कार केला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अविनाश शिंदे यांचे कुटुंब इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पवारवाडी गावामध्ये शेती व्यवसाय करीत आहे. अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण पवारवाडी येथील प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण मानकरवाडीमधील श्री छत्रपती हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले. त्यानंतर सन २०१० मध्ये मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून त्यांना एका खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र, कलेक्टर होण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. 

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय

अखेर त्यांनी सन २०१३ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन थेट दिल्ली गाठली. तेथे युपीएससी परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरु केली. सन २०१६ च्या युपीएससी परीक्षेत यश मिळविले. त्यानंतर इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस या पदाची पोस्ट मिळवली. त्यानंतर सन २०१७ च्या युपीएससी परीक्षेत ते सहायक कस्टम कमिशनर पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांना कलेक्टर बनायचे होते. अखेर त्यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेत यश मिळवत आयएएस (कलेक्टर) पदापर्यंत मजल मारून स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने हे यश मिळविले आहे.

पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये

या यशाबद्दल आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अविनाश शिंदे यांचा सत्कार केला. त्यावेळी भरणे म्हणाले की, ग्रामीण भागतील मुलांकडे अनेक गुण, कौशल्य असतात. त्याचा विकास होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अविनाश यांचे यश असामान्य असून, प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी अनुकूल केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वाटचाल करावी. या वेळी बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र शिंदे व अविनाश यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avinash Shinde from Indapur taluka succeeds in IAS examination