'करुणोपनिषदे'तून उलगडला बाबा आमटे यांचा जीवनप्रवास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा बाबांची शब्दरूपी भेट घडली. बाबांचे कार्य काव्य आणि उताऱ्यातून उभे करताना आपण किती छोटे आहोत, याची जाणीव झाली. वसंत पोतदार यांच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांशी माझी भेट झाली. आज त्याला 44 वर्षे लोटली. परंतु, त्या काळात बाबांनी कसे काम उभे केले असेल, हे पाहिल्यावर अंगावर काटा येतो. 
- नाना पाटेकर, अभिनेते 

पुणे : "आनंदवनी... तळपता सूर्य', "मी मागितली श्रीमंती...', "थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा', "वैराणी वाळवंटी मी सूर्य फुलविताना', अशा रचनांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचा जीवन प्रवास "करुणोपनिषदे' या कार्यक्रमातून उलगडला. 

सृजन फाउंडेशनतर्फे आयोजित "सृजन महोत्सवा'त आमटे यांच्या जीवनावर आधारित "करुणोपनिषदे' हा कवितांचा कार्यक्रम सादर झाला. याची संकल्पना चंद्रकांत काळे यांची होती. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायिका अंजली मराठे, नरेंद्र भिडे आणि अमित त्रिभुवन यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तर अपूर्व द्रविड आणि भिडे यांनी संगीतसाथ दिली. या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर हे प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पाटेकर यांनी आपले मत व्यक्त केले. 

"तळपता सूर्य सारे चराचर दाहतो आहे', "नसतात हो क्षितिजे उंच झेपावणाऱ्या पंखांना', अशा रचनांमधून उत्तरोत्तर बाबांचे विश्‍व उलगडत गेले. काळे म्हणाले, ""बाबांच्या कविता, मुलाखती अशा स्वरूपात माझ्याकडे साहित्य आले. त्याच्यावर जवळजवळ मी वर्षभर काम केले. त्यातून या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. बाबांच्याच रचनांमधून त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व उभे करणे आव्हानात्मक होते. त्यांच्या काही कविता दीर्घ होत्या; परंतु त्याचे संपादन करून त्या गायनातून कसे सादर होतील, यावर लक्ष केंद्रित केले.'' फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. 

Web Title: baba amte's life story through karunopashad