...तर 'एमआयटी' शाळेवर कारवाई होईल; बच्चू कडू यांचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 11 November 2020

गेल्या अडीच वर्षांपासून एमआयटी शाळा आणि पालक यांच्यात बोर्ड बदलण्यावरून वाद सुरू आहे

पुणे- कोथरूड येथील एमआयटी शाळेने विद्यार्थ्यांना जबरदस्तीने एसएससी बोर्ड ऐवजी सीबीएससी बोर्ड घेण्यास भाग पाडू नये, अन्यथा सीबीएसई बोर्डाची एनओसी रद्द करण्यात यावी, असे आदेश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून एमआयटी शाळा आणि पालक यांच्यात बोर्ड बदलण्यावरून वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड घ्यावे किंवा शाळा सोडून जावी असे संस्थेने पालकांना कळविले आहे. त्यास पालकांनी त्यास विरोध केला, त्याविरोधात त्यांचा लढा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील शेकडो विद्यार्थ्यी आॅनलाईन शिक्षणापासून  वंचित आहेत. त्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शाळेच्या पालकांबरोबर राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. रवी गादिया, मनोहर हुम्बर, विनायक कुंभार, संजय जोशी, प्रकाश परमार, गजेंद्र पाटील आदी पालक उपस्थित होते.

तनिष्कची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात

राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बोर्डातून नाव कमी करण्याची सक्ती कशी केली जाऊ शकते. असे होणार असल्यास राज्याचे शिक्षण खाते शाळेवर प्रशासक नेमून शाळेला एसएससी बोर्डाचे शिक्षण देण्यास भाग पाडेल, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. 

बच्चू कडू यांनी पालकांची कैफियत ऐकून घेत, शाळा विद्यार्थ्यांना सक्तीने एसएससी बोर्डाऐवजी सीबीएससी बोर्डात प्रवेश घ्यायला लावू शकत नाही. जर शाळा असेच करणार असेल तर शाळेला नोटीस बजावा किंवा सीबीएससीची एनओसी रद्द करा असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले. 

यासंदर्भात मुख्याध्यापिका माधुरी गोखले म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांपासून शाळेचे बोर्ड बदलण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. याबाबत पालकांना व्यवस्थित माहिती दिली असून कोणालाही बोर्ड बदलण्यासाठी जबरदस्ती केली नाही. तसेच शाळा सोडून जाण्याचे सांगितले नाही. पालकांना सहकार्य केले जात आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bacchu kadu warning to mit school in pune