बारामती-इंदापूर राज्यमार्गावर नागरिकांनी लावले झाड, का ते वाचा सविस्तर

राजकुमार थोरात
Tuesday, 6 October 2020

बारामती-इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी येथे युवकांनी खड्यामध्ये झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

वालचंदनगर : बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे-खड्डेच पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असून, तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी बारामती-इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी येथे युवकांनी खड्यामध्ये झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

बारामती ते इंदापूरचा राज्यमार्ग हा संत तुकाराम पालखी महामार्ग नावाने काही दिवसातच ओळखला जाणार आहे. पालखी महामार्गासाठी भूसंपादन ही सुरु आहे. मात्र या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. यामध्ये चालू वर्षीच्या पावसाचीही भर पडली. इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे दरवषीच्या खड्डामध्ये पेक्षा जास्त खड्डे पडले असून खड्डे चुकविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.

काटेवाडी ते भवानीनगरचा या दरम्यान खड्डात रस्ता की,रस्त्यात खड्डे अशी परस्थिती निर्माण झाली आहे. भवानीनगर ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सणसर गावचे माजी उपसरपंच श्रीनिवास कदम, अभयसिंह निंबाळकर, इंदापूर खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, सचिन भाग्यवंत यांनी काटेवाडीमध्ये रस्त्याच्या मध्यभागीच्या खड्ड्यात झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. 

तरुणाचा गेला जीव...
सोमवार (ता. ६) रोजी अंथुर्णे गावच्या हद्दीमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दुचाकी चालविताना खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी व चारचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा जीव गेला. या अपघाताची वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये अद्यापही नोंद झाली नाही.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad condition of baramati-indapur state highway due to potholes