मांजरी - वारीची वाट बिकट

कृष्णकांत कोबल
सोमवार, 2 जुलै 2018

मांजरी (पुणे) : पालखीच्या आगमनाला केवळ आठवडा राहिला आहे. मात्र, मांजरी हद्दीत थेट पालखी मार्गावर साचलेले ड्रेनेजचे पाणी, वाळू व कचरा अद्यापही साफ करण्यात आलेला नाही. गेली अनेक महिन्यांपासून वेळोवेळी लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मांजरी (पुणे) : पालखीच्या आगमनाला केवळ आठवडा राहिला आहे. मात्र, मांजरी हद्दीत थेट पालखी मार्गावर साचलेले ड्रेनेजचे पाणी, वाळू व कचरा अद्यापही साफ करण्यात आलेला नाही. गेली अनेक महिन्यांपासून वेळोवेळी लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येथील मांजरी स्टडफार्म व बाजार समिती परिसरातील पालखी मार्गावर गेली अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी साठून राहत आहे. सध्या त्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यालाच लागून काही अंतरावर थेट महामार्गावरच मांजरी ग्रामपंचायतने कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. दररोज त्यातील कचरा ओसंडून वाहत असतो. लांबपर्यंत रस्त्यावर हा कचरा पसरत आहे. त्यावर डुकरे, कुत्र्यांचा कायम वावर असतो. ती मार्गावर येत असल्याने वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. 

याच परिसरात वाळूच्या गाड्या उभ्या राहत असतात. त्यातील वाळू मोठ्या प्रमाणात मार्गावर पसरली आहे. त्यामुळे वाहने घसरून छोटेमोठे अपघात होत आहेत. दुभाजकांवर व्यवसायिकांनी जाहिरतीचे फलक लावून विद्रुपीकरण केले आहे. या फलकांमुळेही वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.

पालखी मार्गावरील या अडचणी व धोके याबाबत वारंवार वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही त्यांच्याकडून गांभीर्याने विचार केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

नऊ जुलैला या भागातून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. त्यातील अनेक दिंड्या आदल्या दिवशी परिसरात मुक्कामास येतात. तत्पूर्वीही चार दिवस आगोदर वैयक्तिकरित्या अनेक वारकरी परिसरात दाखल होत असतात. या सर्वांना मार्गावरील अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

"अनेक महिन्यात न सुटलेली अडचण प्रशासनाकडून त्वरीत सुटेल असे वाटत नाही. या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना त्रास होणार असल्याची परिस्थिती सध्यातरी पाहवयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर काम करण्याची गरज आहे.''
- पांडुरंग खरात, ज्येष्ठ नागरीक

"महामार्गावर साठलेल्या ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नागरिकांनी बंद केलेले चेंबर फोडणार आहोत. ग्रामपंचायतला कचराकुंड्या हटविण्यासाठी सूचना दिली आहे. अनाधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवरील कारवाई बाबत पोलीसांना कळविण्यात येणार आहे. वारकऱ्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.''
- गणेश चवरे, कार्यकारी अभियंता, महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: bad condition of road on the way of palakhi in manjari