Pune Rains : सिंहगड रस्त्याची पावसामुळे दैना

जागृती कुलकर्णी
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. यावेळी दुचाकीवरून वाहून जाताना एका तरुणास परिसरातील नागरिकांनी वाचवले.

सिंहगड रस्ता (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरात रात्री झालेल्या पावसाने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रमुख भागांसह अंतर्गत सर्वच भागात पाणी शिरले हिंगणे भागातील खोराड वस्ती, साईनगर, महादेव नगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी होते. रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. यावेळी दुचाकीवरून वाहून जाताना एका तरुणास परिसरातील नागरिकांनी वाचवले.

रोकडोबा मंदिराजवळ देखील गुडघे पाणी होते परिसरात राहणाऱ्या चाळीतील लोकांना एका बंगल्यात राहण्यासाठी सोय करण्यात आली होती. यासोबतच पश्चीमा नगरी सोसायटी विश्रांती नगर भागातील काही सोसायट्या विठ्ठलवाडीतील वरद सोसायटीत पाणी शिरले होते.

सांडपाणी वाहिनीचे देखील पाणी सोसायटीत शिरूर नागरिकांच्या घरापर्यंत आले होते. याठिकाणी स्वच्छतेचे आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यासोबतच आनंदनगर माणिकबाग या सर्व भागात पाणी शिरले होते माणिकबागेत वीर तानाजी तरुण मित्र मंडळाजवळ असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. आनंदनगर चौकातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक दुकानदार यांचे नुकसान झाले. तसेच प्रचिती हॉस्पिटल आणि मधुकर हॉस्पिटल येथेही पाणी शिरले. यासोबतच सनसिटी रस्ता परिसरातील चंद्रकांत दांगट पाटील पॅव्हेलियन या क्रिकेटच्या आणि फुटबॉलच्या मैदानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रजेया सिटीकडे जाणारा रस्ता ओढ्यावरील पूल वाहून गेला. यात वाहनसोबतच काही मृतदेह देखील आढळून आले. दांडेकर पूल दत्तवाडी परिसरात आंबील ओढ्याचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना राष्ट्रसेवा दलाच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad condition on sinhagad road due to heavy rain