गेल्या वर्षात एकच दिवस हवा खराब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सूक्ष्म धूलिकण १०८ दिवस अधिक
गेल्या वर्षी ३० जानेवारी या दिवशी हवा खराब, तर ८ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक खराब असल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षातील ३६५ दिवसांपैकी १०८ दिवस पुणे शहरातील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्‍चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होते. तर, वर्षभरातील १०० दिवस मानकांपेक्षा सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण कमी होते.

पुणे - वाहनांची वाढती संख्या, कचऱ्याचे वाढते प्रमाण, अशी परिस्थिती असूनदेखील गेल्या वर्षातील ३६५ दिवसांमध्ये एकच दिवस पुणे शहरातील हवा अतिशय खराब असल्याचे दिसून आले. २०१८ च्या वर्षभरात १६८ दिवस समाधानकारक, तर १०३ दिवस अतिशय चांगली हवा असल्याचे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालातील माहितीवरून समोर आले आहे.

पुणे शहरातील खासगी वाहनांची संख्या ही जवळपास ३८ लाख ८८ हजारांहून अधिक आहे. त्यामध्ये दरवर्षी दोन लाख नवीन वाहनांची भर पडते आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. मोठ्या प्रमाणावर पुणे शहरात विकासकामे आणि बांधकामे सुरू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या सादर केलेल्या पर्यावरण अहवालाला महत्त्व आहे.

‘आयआयटीएम’ (भारतीय उष्ण कटिबद्धीय हवामान संस्था) या संस्थेकडून पाषाण, लोहगाव, शिवाजीनगर, कात्रज व हडपसर परिसरातील धूलिकण, नायट्रोजन, सल्फर संयुगे, कार्बन मोनॉक्‍साइड आणि ओझोन इत्यादी प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण मोजण्यात आले. त्यामध्ये सूक्ष्म धूलिकण (पीएम १०) व अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाणही मोजण्यात आले.

इंधनाचे ज्वलन, बांधकामे, उघड्यावर कचरा जाळणे आदी घटकांमुळे हे प्रमाण वाढते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर हे निश्‍चित केले आहे. २०१४ ते २०१८ या काळात मंडळाने निश्‍चित केलेल्या मानकांपेक्षा पुणे शहरात ते प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले होते. परंतु, २०१७ मध्ये पाषाण या ठिकाणी हे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे, २०१८ मध्येही हे प्रमाण शहरातील इतर ठिकाणांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. तर, पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात शहरात ‘पीएम १०’चे प्रमाण सर्वत्र कमी आढळून येते. अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण २०१४ ते २०१८ या काळात मानकांपेक्षा अधिक दिसून आले होते. 

२०१७ मध्ये कात्रज या ठिकाणी हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad one day Weather in the last year