महापालिकेत "खड्डा'जंगी ; पदाधिकाऱ्यांतच तू तू - मैं मैं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

हॉटमिक्‍स प्लॅंट पावसाळ्यात बंद असतात, हे इंजिनिअर असलेल्या तुपे यांना माहीत नाही, असा टोला लगावीत, इतर छोट्या रस्त्यांवर खड्डे असल्याचे आम्ही नाकारत नाही, त्याची दुरुस्ती सुरू असल्याचेही धेंडे यांनी नमूद केले.

पुणे : रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते हे दोघे खड्ड्यावरून एकमेकांना आव्हान देत आहेत. 

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा विरोधी पक्षाने सर्वसाधारण सभेत प्रयत्न केला होता. त्यानंतर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यांच्या प्रभागात खड्डे नसल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी डॉ. धेंडे यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे पत्रकारांना दाखविली. याबाबत उपमहापौर धेंडे यांनी शनिवारी तुपे यांना पत्रकार परिषदेत उत्तर देत आमच्या प्रभागातील पाच "डीपी' रस्त्यांवर खड्डे शोधून दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. 

"तुपे यांनी दिलेली छायाचित्रे ही "टॅंक' रस्त्यावरील आहेत. जवळच लष्कराचा तळ असल्याने या रस्त्यावर रणगाडे ये-जा करीत असतात. या मार्गावर पावसाळ्यातच नाही, तर इतर वेळीही खड्डे असतात. विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी ते विमानतळ, गोल्फ क्‍लब ते आंबेडकर रस्ता, कॉमर्स झोन ते टिंगरेनगर या पाच रस्त्यांवर खड्डे नाहीत,''असेही त्यांनी नमूद केले.

हॉटमिक्‍स प्लॅंट पावसाळ्यात बंद असतात, हे इंजिनिअर असलेल्या तुपे यांना माहीत नाही, असा टोला लगावीत, इतर छोट्या रस्त्यांवर खड्डे असल्याचे आम्ही नाकारत नाही, त्याची दुरुस्ती सुरू असल्याचेही धेंडे यांनी नमूद केले. मागील पंधरा वर्षे पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती, त्यांनी कामे कशी करून घेतली हे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. 

Web Title: Bad Road In Pune City Officers arguing