२१७ किमीचे अंतर, ३ पर्वतरांगा; सर्वात अवघड मॅरेथॉनवर पुणेकराची नाममुद्रा | badwater 135 marathon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Kasodekar

२१७ किमीचे अंतर, ३ पर्वतरांगा; सर्वात अवघड मॅरेथॉनवर पुणेकराची नाममुद्रा

समुद्रसपाटीपासून ८५ मीटर खाली असलेल्या स्थानापासून प्रारंभ...तर, समुद्रसपाटीपासून २५३० मीटर उंच असलेल्या स्थानावर शेवट...२१७ किलोमीटरचे अंतर असलेल्या वाटेत सुमारे ४४५० मीटरची चढाई आणि १८५९ मीटरची उतरण असलेल्या तीन पर्वतरांगा...आणि ४०-४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकणारे तापमान...हे वर्णन आहे जगातील सर्वांत अवघड समजल्या जाणाऱ्या ‘बॅडवॉटर १३५’ या मॅरेथॉनचे. वर्णन वाचूनही धडकी भरेल, अशा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ती पूर्ण करणे, ही जगातील काही मोजक्याच धावपटूंच्या आवाक्यातील बाब आहे. या मोजक्या यादीत आता समावेश झाला आहे, पुणेकर आशिष कासोदेकर यांचा.

हेही वाचा: पावसाळ्यात अपघात होवू नये म्हणून ही घ्या काळजी!

कासोदेकर यांनी नुकतीच पार पडलेली ही अवघड मॅरेथॉन पूर्ण करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान ॲडव्हेंचर कॉर्प्स या संस्थेतर्फे घेण्यात आलेली ही मॅरेथॉन त्यांनी ३८ तास, २४ मिनिटे आणि २६ सेकंदात पूर्ण केली. यंदा एकूण ९४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७८ स्पर्धकांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार कासोदेकर यांनी ४० व्या क्रमांकावर मॅरेथॉन पूर्ण केली. यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये ते एकमेव भारतीय स्पर्धक होते.

५० वर्षीय कासोदेकर यांना सायकलिंग, बास्केटबॉलसह विविध मैदानी खेळांची आवड आहे. गेली अनेक वर्षे ते विविध मॅरेथॉन, शर्यती यांमध्ये भाग घेत आहेत. मॅरेथॉनमधील काही वैशिष्ट्यपूर्ण विक्रमही त्यांच्या नावे आहेत. याचवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी सलग ६१ दिवस ६१ मॅरेथॉन धावण्याचा विश्वविक्रम केला होता. पहिल्याच प्रयत्नात ‘एव्हरेस्ट’वर यशस्वी चढाई करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे. ‘ब्राझील १३५ ट्रेल रन’ पूर्ण करणारे ते दुसरे भारतीय आहेत. तर, लडाखमधील ‘ला अल्ट्रा मॅरेथॉन’ पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.

हेही वाचा: केळी खरेदीचं बील तब्बल 35 लाख? उत्तराखंड क्रिकेट संघटनेत 'भत्ता घोटाळा'

मॅरेथॉन नेमकी काय?
१९८७ पासून उत्तर अमेरिकेत दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यात ‘बॅडवॉटर १३५’ ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येते. डेथ व्हॅलीतील बॅडवॉटर बेसिन येथे रात्री आठ वाजता या मॅरेथॉनचा प्रारंभ होतो. तर, २१७ किलोमीटरचे अंतर पार करून माऊंट व्हिटनी शिखर येथे मॅरेथॉन संपते. पाच टप्प्यांमध्ये ही मॅरेथॉन विभागली असून, कमाल ४८ तासांमध्ये ती पूर्ण करणे अपेक्षित असते. जगभरातील धावपटू या मॅरेथॉनसाठी अर्ज करत असतात. त्यातील निकष पूर्ण करणाऱ्या धावपटूंनाच यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होते.

मला नवनवीन आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करायला नेहमीच आवडते. त्यामुळेच ‘बॅडवॉटर १३५’ या मॅरेथॉनचे आव्हान मी स्वीकारले. ही मॅरेथॉन पूर्ण करणे निश्चितच सोपे नव्हते. मात्र मी छोटे-छोटे टप्पे निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित केले. सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक टप्प्याकडे बघत हे आव्हान पार केले.
- आशिष कासोदेकर

Web Title: Badwater 135 Marathon Pune Ashish Kasodekar Creates History Complete The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewssportsMarathon
go to top