बालेवाडीतील पदपथाचे  वाहनतळात रूपांतर 

-शीतल बर्गे 
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे ः येथील निकमार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच इतर नागरिक पदपथ व सायकल ट्रॅकवरच दुचाकी पार्क करत असल्याने पदपथाचे वाहनतळात रूपांतर झालेले आहे. पादचाऱ्यांना या ठिकाणावरून मार्गक्रमण करताना थेट मुख्य रस्त्यावरूनच आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी आहे की वाहनचालकांसाठी, असा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे. 

पुणे ः येथील निकमार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच इतर नागरिक पदपथ व सायकल ट्रॅकवरच दुचाकी पार्क करत असल्याने पदपथाचे वाहनतळात रूपांतर झालेले आहे. पादचाऱ्यांना या ठिकाणावरून मार्गक्रमण करताना थेट मुख्य रस्त्यावरूनच आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी आहे की वाहनचालकांसाठी, असा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे. 

मुंबई-बंगळूर महामार्गाकडून बालेवाडीकडे एक मुख्य रस्ता येतो, त्या ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. येथे सायकल ट्रॅक, पदपथ व वाहनांना पार्क करण्यासाठी वेगवेगळे भाग ठेवण्यात आले आहेत, पण निकमार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेरच असणाऱ्या संपूर्ण सीमा भिंतीला लागून सायकल ट्रॅक व पदपथावरच येथील विद्यार्थी व प्राध्यापक, तसेच इतर नागरिक दुचाकी वाहने पार्क करतात. स्वतःच्या महाविद्यालयाचे वाहन तळ असूनही येथे पार्क केलेल्या दुचाकींमुळे या ठिकाणाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

येथे जवळच मोझे इंजिनिअरिंग महाविद्यालय, मिटकॉन महाविद्यालय, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूल, मोझे इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे सतत विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांची नियमित वर्दळ सुरू असते. पदपथावरील वाहनांचा चालताना अडथळा येत असल्यामुळे पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरूनच चालावे लागते. तसेच या परिसरात अनेक लहान मोठी हॉटेल असल्याने येथे येणारे ग्राहक चारचाकी, दुचाकी रस्त्यावरच पार्क करतात. 

हा रस्ता बालेवाडी, बाणेर, औंध या ठिकाणाला मुंबई बंगळूर महामार्ग तसेच म्हाळुंगे, आय. टी. पार्क असलेल्या हिंजवडीला जोडणारा असल्याने येथे भरपूर रहदारीही असते. 
पादचारी, विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीमुळे वाहतूक विभागाने या ठिकाणी लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

""मी बालेवाडी येथील रहिवासी असून येथून ये-जा करताना निकमार महाविद्यालयाजवळ असणाऱ्या पदपथावरील पार्किंगमुळे भर रस्त्यावरूनच चालावे लागते. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने ते अपघाताला आमंत्रण ठरू शकते.'' - उमा जगताप, बालेवाडी 
 

""महाविद्यालयाच्या आवारात गाड्या उभ्या करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. ज्या वेळी विद्यार्थी येथे प्रवेश घेतात तेव्हाच या मुलांना पार्किंगबद्दल सांगितले जाते, पण तरीही विद्यार्थी व काही प्राध्यापक पदपथावरच वाहने पार्क करत असल्याचे निदर्शनास येत असून, याबद्दल संबंधितांना सूचना देण्यात येतील.'' - घनश्‍याम कारंडे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, निकमार महाविद्यालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Balewadi footpath became in parking