#BalgandharvaRangmandir बालगंधर्व पुनर्विकासाचे धोरण अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर व परिसराच्या पुनर्विकासाचे धोरण आणि निकष महानगरपालिकेने निश्‍चित करावे. त्याशिवाय कोणता विकास आराखडा योग्य आहे, हे ठरविता येणार नाही. तसेच जुने नाट्यगृह कायम ठेवावे, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने महापालिकेला कळविली आहे.

पुणे - पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर व परिसराच्या पुनर्विकासाचे धोरण आणि निकष महानगरपालिकेने निश्‍चित करावे. त्याशिवाय कोणता विकास आराखडा योग्य आहे, हे ठरविता येणार नाही. तसेच जुने नाट्यगृह कायम ठेवावे, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने महापालिकेला कळविली आहे. यावरून या नाट्यगृहाच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

महापालिकेकडे या नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी चाळीस वास्तुविशारदांकडून आराखडे आले होते. त्यातून आठ आरखड्यांचे सादरीकरण तज्ज्ञांच्या समितीपुढे करण्यात आले आहे. यातील एक आराखडा निवडून त्यानुसार नाट्यगृहाचे पुनर्निर्माण केले जाणार आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) तज्ज्ञांच्या समितीत नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचाही  समावेश आहे. त्यांनी याबाबत परिषदेच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासंबंधी लेखी पत्रही महापालिकेच्या भवन रचना कार्यालयास पाठविले आहे.

राजेभोसले म्हणाले, ‘‘महापालिकडे सोळा कोटी ते १६० कोटी रुपयांपर्यंतचे विकास आराखडे आले आहेत. त्यातून एकाची निवड करायची आहे. परंतु या नाट्यगृहाचा पुनर्विकास कसा करायचा, तसेच जुने नाट्यगृह पाडून विकास करणार का, महापालिका पुनर्विकासासाठी किती आर्थिक योगदान देणार आहे? रक्कम कमी पडली, तर उर्वरित रक्कम कशी उभी करणार, याबाबत महापालिकेने निश्‍चित धोरण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे पुनर्विकासाचा आराखडा ठरविता येणार नाही.’’

सध्या अस्तित्वात असलेल्या नाट्यगृहाच्या मूळ वास्तूला धक्का न लावता, नवी वास्तू कशी उभी करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. यातून नाट्यगृहाचा वारसा जपता येईल, तसेच नाट्य प्रयोगही सुरू राहतील. या पुनर्विकासाचा विचार करताना ‘बालगंधर्व’चे भविष्यातील अर्थकारण महापालिकेला ठरवावे लागेल. जेणेकरून नव्या वास्तूची भविष्यातील काळजी घेता येईल, असे राजेभोसले यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

‘बालगंधर्व’ हे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील नाट्यगृह आहे. त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी देशातील विख्यात वास्तुविशारदांचे अभिप्राय घेतले पाहिजेत, अशी मागणी करताना नाट्य परिषदेने केलेल्या सूचना आणि पुनर्विकासाच्या धोरणाबाबत लेखी उत्तर महापालिकेने द्यावे.
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, नाट्य परिषद पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balgandharv redevelopment policy