विरोध करा; पण आधी ऐकून तरी घ्या...!

Balgandharva-Auditorium
Balgandharva-Auditorium

बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याचा संकल्प महापालिकेने जाहीर केल्यावर, अशा कोणत्याही प्रकल्पाबाबत पुण्यात पाळल्या जात असलेल्या प्रथेनुसार त्याच्यावर टीकेचा चौफेर भडिमार सुरू झाला आहे. पुण्यनगरीचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‌घाटन जून १९६८ मध्ये झाले. त्यावेळची शहराची लोकसंख्या, नाट्यरसिकांच्या अपेक्षा, तत्कालीन गरजा आदींचा विचार करता, तेव्हा ते सर्वोत्कृष्टच होते. त्याला पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे.

नाट्यरसिकांची सर्वाधिक पसंती असलेल्या या वास्तूत वेळोवेळी अनेक गैरसोईंनाही तोंड द्यावे लागले आहे. पावसाळ्यात होणारी गळती, सदोष ध्वनी आणि वातानुकूलन यंत्रणा, आसन व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्थिती याबद्दल अनेक रंगकर्मींनी त्या- त्या वेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार उद्‌भवणाऱ्या या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आजवर लाखो रुपये खर्ची पडले आहेत. त्याचा एकत्रित हिशेब मांडला, तर त्यातून कदाचित एखाद्या नवीन प्रेक्षागृहाची निर्मिती झाली असती!

अत्याधुनिक संकुलाचा प्रस्ताव
या पार्श्‍वभूमीवर हे रंगमंदिर पाडून त्या जागी ‘मल्टिप्लेक्‍स’ चित्रपटगृहांसारखे अत्याधुनिक संकुल उभारण्याचा विचार पुढे आला आहे. ‘बालगंधर्व’ची आसन संख्या (बाल्कनीसह) ९८७ आहे. नव्या रचनेत वेगवेगळ्या आसनक्षमतेची तीन- चार प्रेक्षागृहे होऊ शकतात, त्यामुळे माफक प्रेक्षकसंख्या अपेक्षित असलेल्या कार्यक्रमांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यात प्रायोगिक नाटकांनाही एक चांगला रंगमंच उपलब्ध होईल. या रंगमंदिरानजीक मेट्रोचे स्थानक प्रस्तावित आहे. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी या स्थानकाला जोडणारी स्वतंत्र मार्गिका काढता येऊ शकेल किंवा कसे, याचाही विचार या प्रकल्पात होऊ शकतो. विविध कलाप्रदर्शनांसाठी आधुनिक दालन, प्रशस्त वाहनतळ, सुसज्ज उपाहारगृह आदी सुविधाही त्यात अपेक्षित आहेत.

ही तर पुलंना आदरांजली
फेरउभारणीच्या प्रक्रियेत हे रंगमंदिर पाडणार, की ते कायम ठेवून शेजारी दुसरी वास्तू उभारणार, याबाबत सध्या तरी काहीच ठरलेले नाही. त्याचे आराखडे तयार होत आहेत. मात्र, स्वरूप स्पष्ट होण्याआधीच त्याला राजकीय पातळीवर विरोध होऊ लागला आहे. विषय कोणताही असो, काही मंडळी कायम आंदोलनोत्सुक असतात, त्यांनीही पालिकेला इशारे द्यायला सुरवात केली आहे. ‘बालगंधर्व रंगमंदिर हा शहराचा सांस्कृतिक वारसा असल्यामुळे तुम्हाला जे काही करायचे आहे, ते सध्याच्या वास्तूला धक्का न लावता करा,’ असा त्यांच्या युक्तिवादाचा सारांश आहे. वस्तुतः रंगमंदिराचे बाह्यस्वरूप - रचना कायम असली, तरी अंतर्भागात दुरुस्तीच्या निमित्ताने वेळोवेळी अनेक बदल झाले आहेत, त्यामुळे ते १९६८ मध्ये जसे होते, त्यात तसूभरही फरक झालेला नाही, असे समजण्याचे कारण नाही. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत मोठे योगदान आहे. त्यांची जन्मशताब्दी सुरू असताना रंगमंदिर जमीनदोस्त करणे चूक आहे, असाही मुद्दा काही जण मांडत आहेत; परंतु हे नाट्यगृह पाडून अधिक चांगली, पुण्याच्या वैभवात भर पडेल अशी अत्याधुनिक वास्तू निर्माण केली, तर पुलंना वाहिलेली ती एक आदरांजली ठरेल, असा विचार का केला जात नाही?

व्यावहारिक विचार गरजेचा
या संदर्भात भावनिक न होता, व्यावहारिक पातळीवर विचार केला पाहिजे. पुणे पूर्वी वाड्यांचे शहर होते. हे वाडे अनेक पिढ्यांचे साक्षीदार होते. वाडवडिलांनी शंभर- दोनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या वाड्यांत संबंधित कुटुंबांची भावनिक गुंतवणूक होती. तथापि, बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांच्या वारसांनी हे वाडे जमीनदोस्त करून बहुमजली इमारती उभारल्या. वैयक्तिक पातळीवरचा हा ‘वारसा’ नाहीसा होताना त्याचे नकारात्मक पडसाद कधी उमटले नाहीत; पण पन्नास वर्षांपूर्वीच्या बालगंधर्व रंगमंदिरासारखा- सार्वजनिक पातळीवरचा विषय येतो, तेव्हा हा वारशाचा विषय टोकदार बनतो. पुनर्विकासासाठीही त्याला कोणी हात लावता कामा नये, अशी भूमिका घेतली जाते, हे आश्‍चर्यकारक आहे!

परवडणारे भाडे
या वास्तूची फेरउभारणी करताना, ते काम पूर्ण होईपर्यंत रंगमंदिर नाटकांच्या प्रयोगासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. नाट्यव्यावसायिकांची खरी अडचण आहे ती ही. हे नाट्यगृह महापालिकेचे असल्याने त्या ठिकाणचे भाडे माफक आहे. एका प्रयोगासाठी सुमारे साडेसहा ते सात हजार रुपये खर्च येतो. महापालिकेचेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह येथेही प्रयोग होतात; पण ती मध्यवर्ती भागात नाहीत. खासगी प्रेक्षागृहात नाटकाचा खेळ लावताना भाड्यापोटी दुपटीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतात, त्यामुळे अनेक नाट्यकर्मींना कोणत्याही कारणास्तव ‘बालगंधर्व’ दीर्घ काळ बंद राहणे रुचणारे नाही. त्यातूनही फेरउभारणीच्या कल्पनेला विरोध होत आहे. 

योजना प्राथमिक अवस्थेत
विरोधामागची कारणे कोणतीही असोत; पण या संदर्भात पालिकेची योजना नेमकी काय आहे, हे संबंधितांनी आधी नीट समजून घेतले पाहिजे. कलाकार, निर्माते, नाट्यरसिक, तसेच रंगभूमीशी संबंधित अन्य सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचा अंतिम प्रस्ताव काय आहे, हे आधी माहीत करून घेतले पाहिजे. त्यांचा निर्णय अयोग्य वाटला, तर तो चुकीचा का आहे, हे सकारण मांडता येईल; पण निदान पालिकेचे म्हणणे ऐकून तरी घेऊयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com