बालरक्षकांनी शोधली शालाबाह्य मुले

रावेत - स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडून शोध घेण्यात येत आहे.
रावेत - स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडून शोध घेण्यात येत आहे.

पिंपरी - ऊसतोड कामगारांप्रमाणे ऑक्‍टोबरपासून कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरात ‘बालरक्षक’ संकल्पना राबवली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील सातशे मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, त्यासाठी ७८ ‘बालरक्षक’ काम करीत आहेत.

प्राथमिक व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व पालिकेचा शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षापासून ‘बालरक्षक’ संकल्पना राबवली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सहा ते चौदा या वयोगटातील बहुसंख्य शालाबाह्य मुले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची ‘बालरक्षक’ म्हणून नेमणूक केली आहे. शाळेत दाखल न झालेली मुले, तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेल्या मुलांचा शोध घेणे आदी काम ते करतात. माहिती संकलित करण्यासाठी ‘बालरक्षक’ ॲप कार्यान्वित केले आहे. वर्षभर या मुलांचा शोध घेऊन वयानुसार शाळेत दाखल करण्याची जबाबदारी बालरक्षकांवर आहे.

मोहिमेअंतर्गत बालरक्षक शरद लावंड यांनी शाळेत दाखल असलेल्या मात्र, एका महिन्यापेक्षा अधिक काळ गैरहजर राहणारे व शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी ‘डोअर स्टेप’ संस्थेच्या माध्यमातून शोध घेतला. त्यासाठी मुख्याध्यापिका विजया भोंडवे व मंदा भुजबळ यांच्या मदतीने वस्त्यांमध्ये पालकसभा घेतल्या. या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या पुनावळे प्राथमिक शाळेत ६० ऊसतोड कामगारांची मुले दाखल झाली. तसेच काटेवस्ती, ढवळेवस्ती, कोयतेवस्ती, माळवाडी, गायकवाडवस्ती येथून वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी बससेवा सुरू केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पालकांमध्ये शाळेत पाठविण्याबाबत उदासीनता असल्याचे लावंड यांनी सांगितले. पालिकेच्या मराठी शाळा जगल्या पाहिजेत, यासाठी लावंड प्रयत्न करत आहेत.

शालाबाह्य विद्यार्थ्यांना पालिकेच्या विविध शाळांमध्ये आरटीई नियमानुसार प्रवेश दिला. शाळा परिसरात गृहभेटी, वीटभट्टी कामगार, सिग्नलवर थांबणारी मुले, बांधकाम परिसरात सर्वेक्षण केले. त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले आहे. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com