शहरातील मद्यविक्रीवर बंदीचा विचार - महापौर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे - ""सर्वोच्च न्यायालयाकडून महामार्गावरील दारूविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील अंतर्गत रस्त्यावरील मद्यविक्रीला बंदी घालता येईल का, याविषयी आम्ही विचार करत आहोत. कारण दारूबंदीने महापालिकेचा महसूल बुडाला तरी चालेल, मात्र महिलांचे संसार बुडू नयेत, ही त्यामागील भावना आहे,'' असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

चंदननगर येथील "आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र' आणि "सायबेज आशा ट्रस्ट'तर्फे आयोजित "14 व्या निवासी व्यसनमुक्ती मोफत शिबिरा'च्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे व्यसनमुक्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल आनंदवन संस्थेला प्रमाणपत्र देण्यात आले. सायबेज आशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयकृष्णन, वंडर बुकचे सुवर्णा श्री, दिनेश पैठणकर, स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, पी. रामचंद्रन, महेंद्र गलांडे, केंद्राचे संचालक डॉ. अजय दुधाणे, विश्वस्त भास्कर काळभोर आदी उपस्थित होते. तसेच, व्यसनमुक्त झालेल्या तरुणांनी अनुभव सांगितले. 

मुक्ता टिळक म्हणाल्या, ""दारूबंदी केल्यास महापालिकेचा निम्मा महसूल बुडणार आहे. मात्र, त्यामुळे अनेकजण व्यसनांपासून दूर राहतील. तरुणांना व्यसनमुक्त करून त्यांच्यात कौशल्ये विकसित करण्यावर भर असला पाहिजे. हे पोलिस, स्वयंसेवी संस्था यांना ते साध्य करता येईल. आनंदवनने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्या बंद करण्यासाठीही प्रयत्न करू.'' 

डॉ. दुधाणे म्हणाले, ""आम्ही सुमारे 800 व्यक्ती व्यसनमुक्त केल्या आहेत. तरुणांमधील व्यसनाधीतेमुळे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान होते. महापालिकेने यामध्ये लक्ष घालून पुणे शहराला पहिली दारूमुक्त महापालिका बनविण्यासाठी प्रयत्न करावा. सध्या इंटरनेट ऍडिक्‍शन वाढत आहे. त्यातून युवकांना सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा.'' 

Web Title: Ban on the sale wine in the city - Mayor