खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक

खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक
Published on

पान २
-----------
खानदेशात केळी
कंदांखाली क्षेत्र अधिक

प्रति कंद अडीच ते तीन रुपयांपर्यंत व्यवहार


अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात केळीची लागवड गतीने सुरू असून, उत्पादन खर्चही वाढत आहे. केळीचे दर अस्थिर असल्याने सध्या खर्च कमी करण्यासाठी लागवडीसाठी केळी कंदांना मागणी वाढली आहे.
यातच अनेक शेतकऱ्यांनी कंद लागवडीला प्राधान्य दिले आहे. मात्र सध्या पाऊस कमी असल्याने लागवडीची कार्यवाही संथ झाली असून, कंदांचा पुरवठा वाढला आहे. परिणामी, कंदांचे दर घसरले असून ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांतील कंदांचे दर मजुरीसह प्रति कंद चार ते पाच रुपयांपर्यंत आहेत.
ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांतील कंदांना खानदेशात कांदेबाग केळी लागवडीसाठी मोठी मागणी होती. मागील आठवड्यातही ही मागणी बऱ्यापैकी होती. मात्र या आठवड्यात कंदांचे दर घसरले आहेत. आगाप कांदेबाग केळी लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी पुढे ढकलणे आणि कंदांचा वाढलेला पुरवठा, या कारणांमुळे दरात घसरण झाली आहे.
मागील पंधरवड्यात ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांतील कंदांचे दर प्रति कंद चार ते पाच रुपये होते. या दरात केळी कंद काढण्याची मजुरी तसेच शेतकऱ्याने वाहतुकीसाठी आणलेल्या वाहनात कंद भरून देण्याची जबाबदारीही कंद मालकाकडे होती. मात्र मागील चार ते पाच दिवसांत कंदांचे दर घसरले आहेत. अनेक कंद मालक किंवा पुरवठादार शेतकरी प्रति कंद तीन रुपये दर घेत आहेत, तर काही शेतकरी अडीच रुपये प्रति कंद दरानेही विक्रीस तयार आहेत.
मृग बहरातील केळी लागवडीसाठी मे ते जून हा कालावधी अनुकूल मानला जातो. जुलैमध्ये उशिराच्या बागांची लागवड केली जाते. पुढील काळात पाऊस झाल्यास केळी पिकाला त्याचा लाभ होईल.

रोपांची मागणी कमी
मध्यंतरी जिल्ह्यात जेवढी कंद लागवड होती, तेवढीच केळी रोपांची लागवडदेखील होत होती. मात्र केळीचे दर आता वर्षभरात केवळ एक ते दोन महिनेच स्थिर राहतात. मागील वर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीत केळीचे दर कमी होते. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस आखातात युद्ध सुरू झाल्याने केळीच्या दरात मोठी पडझड झाली होती. यंदा जून ते १० जुलैपर्यंत केळीचे दर स्थिर होते. मात्र या आठवड्यात दरात मोठी घसरण झाली आहे.
केळीचे दर अस्थिर असल्याने उत्पादन खर्च कमी करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एक केळी रोप पोच स्वरूपात १८ ते २१ रुपयांना मिळते. सुरुवातीलाच एका झाडामागे १८ ते २१ रुपये खर्च करण्यापेक्षा कंद लागवड करून त्यावर खते व फवारणीसाठी खर्च करावा आणि चांगल्या नियोजनातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यावे, अशी भूमिका सध्या अनेक शेतकरी घेत आहेत.

रोपांसंबंधी नियमनाचा अभाव
केळी रोपांची निर्मिती व पुरवठा हा प्रामुख्याने खासगी कंपन्यांच्या हाती असून, त्यावर शासनाचे फारसे नियंत्रण नाही. जिल्ह्यात गुजरात, मध्य प्रदेश तसेच दक्षिण भारतातील कंपन्यांकडूनही केळीची रोपे उपलब्ध करून दिली जातात. अनेकदा रोपे न वाढणे, पिवळी पडणे किंवा रोगग्रस्त होणे अशा समस्याही उद्‍भवतात. मध्यंतरी केळीच्या रोपांमध्ये कुकुंबर मोसॅक विषाणूचा (सीएमव्ही) प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. या समस्या लक्षात घेऊन अनेक शेतकरी केळी लागवडीसाठी कंदांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com