बंद पाइपलाइनमुळे शेती कशी जगेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

भवानीनगर - ‘‘कालव्याऐवजी बंद पाइपने पाणी नेणार असल्याचे राज्य सरकार सांगते, ते अभ्यास करतात का, असाच प्रश्‍न पडतो. बंद पाइपने येथील शेती आणि उद्योग तरी जिवंत राहतील का?’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाचकवस्ती येथे केली.

भवानीनगर - ‘‘कालव्याऐवजी बंद पाइपने पाणी नेणार असल्याचे राज्य सरकार सांगते, ते अभ्यास करतात का, असाच प्रश्‍न पडतो. बंद पाइपने येथील शेती आणि उद्योग तरी जिवंत राहतील का?’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाचकवस्ती येथे केली.

जाचकवस्ती येथे ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन पवार यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार दत्तात्रेय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंक संचालक अप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदच सभापती प्रवीण माने, वैशाली पाटील, सरपंच ज्योती काळे, उपसरपंच दत्तात्रेय जामदार, विक्रमसिंह निंबाळकर, बाळासाहेब जाचक आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘जाचकवस्तीच्या परिसरात आज विकास दिसतो आहे, मात्र तो विकास दिसेल का? अर्थात गावाचा विकास हा कोणीतरी स्वतःला झोकून दिल्याशिवाय 

होत नाही, जाचकवस्तीमध्ये हे काम घडते आहे याचा आनंद आहे. जाचकवस्तीच्या ग्रामपंचायतीसाठी येथील दानशूरांनी १७ गुंठे जागा दिली. रस्त्याच्या कडेच्या महागड्या जागा सहजपणे लोक देतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे.’’ दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘‘अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यात सर्वाधिक  विकासकामे केली. विकासकामांना निधी कसा आणायचा हे अजित पवारांकडूनच शिकलो. त्यामुळे सत्ता विरोधात असूनही तालुक्‍यात सर्वाधिक विकासकामे झाली.’’ या वेळी प्रवीण माने, विक्रमसिंह निंबाळकर, ज्योती काळे, भीमराव जामदार यांची भाषणे झाली. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. अनिल रूपनवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘अभ्यास न करताच विधाने’
अजित पवार म्हणाले, ‘‘बंद पाइपने पाणी न्यायचे ठरवले, तर इथलाच विचार केला, तर छत्रपती, सोमेश्वर, माळेगावसारखे कारखाने बंद पडतील. येथील सर्व पिके उद्‌ध्वस्त होतील. इथे एकाही विहिरीला जिवंत पाणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोणताच अभ्यास न करता अशी विधाने सरकारमधील मंडळी करतात याचे आश्‍चर्य वाटते.’’ 

Web Title: bandh pipeline water supply issue