बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा - भाई वैद्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - ""सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदींचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढ निश्‍चय करून आलेले हे लोक आहेत. त्यामुळे "सब का साथ, सब का विकास' ही निव्वळ धूळफेक आहे. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा,'' असे मत समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. 

अठराव्या बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल, साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण यांना "राष्ट्रीय बंधुता पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. बाबूरावजी घोलप महाविद्यालयाला "स्वामी विवेकानंद पुरस्कार' देण्यात आला. उल्हास पवार, भालचंद्र भागवत, संघटक शंकर आथरे, महेंद्र भारती उपस्थित होते. 

वैद्य म्हणाले, ""भारता पाठोपाठ अमेरिकेतही सत्तापालट झाल्याने संकुचित विचारांचे प्रवाह जोराने वाहत आहेत. मुसलमानांना शत्रुत्वाची वागणूक दिली जाऊ लागली आहे. हिंदूराष्ट्र निर्मितीचे ध्येय बाळगलेले लोक इतरांवर देशद्रोही आणि देशप्रेमाचे शिक्के मारत आहेत. हे गंभीर आहे.'' 

पटेल म्हणाल्या, ""स्वातंत्र्यानंतरही महिलांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. माणुसकी संपत चालल्याने दु:ख, वेदना वाढताहेत. सत्ताधाऱ्यांमधली असंवेदनशीलता पाहून मन व्यथित होतेय.'' 

समता आणि बंधुतेचा विचार बोथट होतो आहे. जातीचे संघटन, मोर्चे प्रबळ होताहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात अराजक माजेल. जातीनिर्मूलन, जातीचे उच्चाटन केल्याशिवाय देशात "अच्छे दिन' येणार नाहीत. 
- प्रा. रामनाथ चव्हाण, साहित्यिक 

Web Title: bandhuta sahitya sammelan