बॅंकांकडून कर्जवसुलीची अघोरी पद्धत

Bank-Loan-Recovery
Bank-Loan-Recovery

भवानीनगर - काझड येथील शंकर ज्ञानदेव वीर बारामतीतल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्जदार व थकबाकीदार आहेत. आज त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांनी बोलावून घेऊन कर्ज भरता येत नसेल तर दोन एकर विकून टाका, असा सल्ला दिला. तर दुसऱ्या घटनेत सणसरच्या महाराष्ट्र बॅंकेत कर्जदाराची संमती नसताना त्याच्या बचत खात्यावरील रक्कम बॅंकेने परस्पर त्याच्या कर्ज खात्यात जमा केली. 

इंडियन ओव्हरसीज बॅंकेत शंकर वीर या शेतकऱ्यास निरोप देऊन बोलावले होते. त्यांच्याकडे पीककर्ज थकले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी कर्ज घेतले. त्याची परतफेड केली नसल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून बॅंकेने त्यांना जाब विचारला. तेव्हा द्राक्षाचे उत्पादन घटले, दुष्काळी स्थिती व पाण्याची टंचाई ही कारणे देत थोडा कालावधी द्यावा, असे वीर यांनी सांगितले. मात्र, बॅंकेचे विभागीय प्रबंधक अमितकुमार शुक्‍ला यांनी वीर यांना तातडीने जमीन विका व मोकळे व्हा, आम्हालाही मोकळे करा आणि तुमची नियतच खराब आहे, अशा शब्दांत सुनावले. 

दरम्यान यासंदर्भात बॅंकेचे अधिकारी राहुल निकम व अमितकुमार शुक्‍ला यांच्याशी संपर्क साधला असता, चेन्नईहून कर्जावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे आम्ही वीर यांना बोलावून त्यांच्याकडे परतफेडीविषयी विचारणा केल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, काझड येथीलच कुंडलिक जाधव यांचे महाराष्ट्र बॅंकेच्या सणसर शाखेत खाते आहे. त्यांच्याकडेही बॅंकेचे काही कर्ज आहे. मात्र, कर्जखाते व बचत खाते स्वतंत्र आहे. जाधव यांनी भवानीनगर येथे एका व्यक्तीस १७ हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो वटला नाही. त्या व्यक्तीने जाधव यांना खात्यात पैसे नाहीत का अशी विचारणा केली. त्यावर खात्यात पैसे असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

धनादेश मिळालेल्या व्यक्तीने बॅंकेत विचारणा करताच बॅंकेच्या व्यवस्थापकांनी जाधव यांच्या खात्यावरील बचतीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करून घेतल्याचे सांगितले. दोन्ही खाती स्वतंत्र व कर्ज भरून घेण्यासाठी संमतीचे पत्र नसतानाही बॅंकेने पैसे भरून घेतले.

बॅंकांची कर्जखाती थकली आहेत हे मान्य, परंतु गेली तीन वर्षे परिस्थिती भीषण आहे. द्राक्ष लागवडीनंतर तीन वर्षांनी द्राक्षाचे उत्पादन मिळते. बॅंकांनी वसुलीसाठी खासगी सावकाराप्रमाणे पद्धत वापरावी हे नियमाला धरून नाही. आम्ही या विरोधात आंदोलन करणार आहोत. 
- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

‘जबरदस्ती केल्यास झोडपू’ 
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘काही बॅंका दुष्काळाच्या स्थितीतही तृतीयपंथीय, गुंडांचा आधार घेऊन जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून वसुली करू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश बॅंका मानत नसतील तर आम्ही आता शेतकरी सोबत घेऊन बॅंकवाल्यांना झोडपून काढू.’’ 

संबंधित शेतकऱ्याचे पैसे २९ सप्टेंबर रोजी कपात केले आहेत. मात्र, यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे. 
- निरंजनकुमार, व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सणसर (ता. इंदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com