पुण्यात भरदिवसा बॅंकेतून २८ लाख लंपास

bank-Theft
bank-Theft

पुणे - बॅंकेमध्ये ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी भरदिवसा बॅंकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत तब्बल २८ लाख नऊ हजार रुपयांच्या नोटा असलेली लोखंडी पेटी पळवून नेली. स्टेट बॅंकेच्या टिंबर मार्केट शाखेत शुक्रवारी (ता. २२)  सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हा धक्‍कादायक प्रकार घडला.

वर्तिका प्रांशू श्रीवास्तव (वय ३५, रा. हडपसर) यांनी याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नेहरू रस्त्यावरील हॉटेल सेव्हन लव्ह्‌जजवळ स्टेट बॅंकेची टिंबर मार्केट शाखा आहे. शुक्रवारी सकाळी बॅंक उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू झाले. अकरा वाजण्याच्या सुमारास अन्य ग्राहकांप्रमाणेच १३ जण बॅंकेमध्ये ग्राहक बनून आले. त्यांनी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलण्यामध्ये गुंतविले. त्याचवेळी ३५ वर्षीय व्यक्तीने बॅंकेच्या रोखपालाच्या केबिनमागे प्रवेश केला. तेथील रोकड ठेवलेली लोखंडी पेटी घेऊन तो बॅंकेच्या बाहेर पडला. बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांना काही कळण्याच्या अगोदरच चोरट्यांनी ही पेटी पळविली. त्या लोखंडी पेटीमध्ये दोन हजार रुपयांच्या ४,८६, ५०० रुपयांच्या ३१२७, २०० रुपयांच्या ५३१, १०० रुपयांच्या १६६६ नोटा होत्या. 

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह खडक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या गुन्ह्याच्या तपासाला सुरवात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com