‘कॉसमॉस’मधून ठेवी न काढण्याचा बॅंकांचा ठराव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे - जिल्ह्यातील कोणत्याही नागरी सहकारी बॅंकांनी सद्य:स्थितीत कॉसमॉस सहकारी बॅंकेमधून ठेवी काढून घेऊ नयेत, असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. तसेच, सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील घडामोडींची माहिती आदान-प्रदान करण्यासाठी मध्यवर्ती माहिती केंद्र (सेंट्रल नॉलेज हब) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या वतीने शनिवारी (ता. १८) सहकारी बॅंकांची बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, संगणक क्षेत्रातील निरंजन फडके, मोहन कामत, जिल्हा बॅंक्‍स असोसएिशनचे उपाध्यक्ष भरत टकले, कार्यकारी संचालिका संगीता कांकरिया यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूरसह आदी जिल्ह्यांतून सहकारी बॅंकांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि आयटी प्रमुख या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सहकारी बॅंकांनी घाबरून ‘कॉसमॉस’मधून त्यांच्या ठेवी, रकमा काढून घेऊ नये, असा ठराव अनास्कर यांनी बैठकीत मांडला. हा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला. कॉसमॉस बॅंकेतील सायबर हल्ल्याच्या तपासातील निष्कर्षानुसार सहकारी बॅंकांनी खबरदारीबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

‘सहकारामध्ये सहकार्य’ या प्रमुख सहकारी तत्त्वानुसार सर्व सहकारी बॅंकांनी कॉसमॉस बॅंकेच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एकी हेच बळ’ या म्हणीनुसार सहकारी बॅंकांनी प्रतिस्पर्धी न होता परस्परांशी सहकार्याची भूमिका ठेवल्यास भविष्यात अडचणींना सामोरे जाण्यास सहकारी बॅंकिंग क्षेत्र सक्षम असेल. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

Web Title: Banks decision to not withdraw deposits from Cosmos bank