अपुऱ्या अर्थपुरवठ्यामुळे बॅंकांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सुट्या पैशांच्‍या साठेबाजीची शक्यता; पाचशेच्या मुबलक नोटांची अद्यापही प्रतीक्षा

सुट्या पैशांच्‍या साठेबाजीची शक्यता; पाचशेच्या मुबलक नोटांची अद्यापही प्रतीक्षा

पुणे - बॅंकांच्या एटीएम केंद्रांचे नव्वद ते शंभर टक्के रिकॅलिब्रेशन झाले असतानाही त्यामधून सुटे पैसे काढून त्याची साठेबाजी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे दोन-अडीच तासांतच पैसे संपल्याचे फलक लावावे लागत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी करूनही अपुरा अर्थपुरवठा होतो. त्यातच बहुतांश बॅंकांच्या गंगाजळीत पाचशेच्या नव्या नोटांचा खडखडाटच आहे. अद्यापही पाचशेच्या नव्या नोटांचा पुरवठाही मुबलक प्रमाणात होत नसल्याने दररोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी बॅंकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  

राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका त्यांच्याकडील एटीएमचे ९० ते ९५ टक्के रिकॅलिब्रेशन झाले असल्याचा दावा करत आहे; परंतु बहुतांश एटीएममध्ये अद्यापही दोन हजार आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे.

नागरिकही दोन हजारांची नोट नको, म्हणून अठराशे किंवा एकोणीसशे रुपये काढत आहेत. परिणामी, एटीएम केंद्रांवरील रोकड दोन-अडीच तासांतच संपत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. नागरिकांची सुट्या पैशांची मागणी पुरवायची असेल, तर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पाचशेच्या नव्या नोटांची छपाई वेगाने करून दररोजच्या चलनात त्या अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असे बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  

बॅंकांकडून भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे रोजच्या गरजेनुसार चलनपुरवठ्याची मागणी होते; परंतु तरीही करन्सी चेस्टकडे येणारी रक्कम ३० ते ४० टक्केच आहे. त्यातून मार्ग काढणार तरी कसा?  रेशनिंग सिस्टिमही किती दिवस राबविणार ? खातेदारांच्या रोषाला किती वेळा सामोरे जाणार? काही नागरिक एक दिवसाआड किंवा दररोज दोन-अडीच हजार रुपये काढण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यांना तरीही किती वेळा तोंड देणार ? असे विविध प्रश्‍न बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित करत आहेत. नागरिकांनाही सुटे पैसे भरा, असे आवाहन करण्यात येते; परंतु त्याला मर्यादितच प्रतिसाद मिळत आहे. साहजिकच बॅंकेत जमा झालेली रोकड आणि खातेदारांनी केलेला भरणा यावर अन्य नागरिकांची गरज भागवावी लागत आहे. उपलब्ध रोकडनुसार एटीएम केंद्रांवर पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये काही वेळेला दोन हजारांच्याच नोटा, तर काही वेळेला दोन हजार आणि शंभराच्या नोटा, तर काही वेळेस दोन हजार, पाचशे आणि शंभरच्या नोटांचा भरणा होतो; परंतु नागरिकही सुट्या पैशांसाठी रांगा लावतात. परिणामी, एटीएम केंद्रांवरही सातत्याने पुरवठा करण्यासाठी चलन नसल्याबद्दल बॅंकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी पाचशेच्या नव्या नोटा बॅंकांकडे टोकन मनी स्वरूपात आल्या. आयसीआयसीआय बॅंकेकडून बॅंक ऑफ इंडियाने ‘मनी एक्‍स्चेंज’मध्ये सव्वा कोटीच्या पाचशेच्या नव्या नोटा घेतल्या होत्या, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडेही आलेल्या पाचशेच्या नोटांस्वरूपात आलेले पाच कोटी रुपये रोजच्या वितरणात देऊन संपल्या. बॅंक ऑफ महाराष्ट्रकडेही पाचशेच्या नोटा आल्याचे सांगण्यात येते; परंतु त्यांच्या शाखांवर मर्यादित स्वरूपातच या नोटांचा पुरवठा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कदाचित पुढच्या आठवड्यात आरबीआयकडून होणाऱ्या अर्थपुरवठ्यात पाचशेच्या नव्या नोटांचे प्रमाण अधिक असल्यास नागरिकांच्या मागणीप्रमाणे सुटे पैसे देता येतील, या आशेवर सध्या बॅंकांचे व्यवहार सुरू असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

बॅंक ऑफ इंडिया 
पुणे शहर - ४५ शाखा,  एटीएम - १३०
दररोजची गरज - सात कोटी 
एटीएमची दररोजची गरज - तीन कोटी. 
९३ टक्के एटीएमचे रिकॅलिब्रेशन पूर्ण केल्याचा बॅंकेचा दावा. 
आरबीआयकडून बॅंकेला झालेला पुरवठा
(८ नोव्हेंबरनंतर तीन वेळा) 
१) ३५ कोटी २) २५ कोटी ३) २१.२ कोटी
आयसीआयसीआयकडून घेतल्या होत्या पाचशेच्या सव्वा कोटी नोटा.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया 
पुणे शहर - ९० शाखा. 
दररोजची गरज - १८ कोटी.  
एटीएम - चारशे 
दररोजची गरज - १० कोटी 
९५% रिकॅलिब्रेशन पूर्ण केल्याचा बॅंकेचा दावा
आरबीआयकडून बॅंकेला झालेला पुरवठा
(८ नोव्हेंबरनंतर चार ते पाच वेळा) 
प्रत्येक वेळेस २० कोटींचा पुरवठा. 
गेल्या आठवड्यात मिळाल्या पाचशेच्या नव्या पाच कोटी रुपयांच्या नोटा.

Web Title: Banks distracted by short money supply