बारामतीच्या भेळीचा डंका वानखेडे स्टेडीयमपर्यंत...

Raju-Shaikh
Raju-Shaikh

बारामती - ....महत्वाकांक्षांना गगन ठेंगणे असते, असे म्हटले जाते त्याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. बारामतीचे नाव तसे सर्वदूर पसरलेले असले तरी आता पुन्हा एकदा बारामतीचे नाव एका वेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहे.....

येथील भेळ व्यावसायिक राजू शेख यांच्या भेळीचा डंका थेट वानखेडे स्टेडीयमवरील भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया एक दिवसीय क्रिकेट सामन्यात वाजणार आहे. एका छोट्याशा गाड्यापासून सुरु केलेल्या या भेळीच्या व्यवसायाने राजू शेख यांना थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भेळविक्रीपर्यंत नेऊन ठेवले आहे. 

केवळ बारामतीपुरताच भेळ विक्रीचा व्यवसाय करायचा नाही तर या क्षेत्रात स्वताःची वेगळी ओळख निर्माण करायची हे राजू यांनी व्यवसाय सुरु करतानाच ठरवले होते. बारामतीतच भेळ विक्री करताना त्यांनी आपले वेगळेपण वेळोवेळी दाखवून दिले. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या विज्ञान जत्रेपासून ते कृषी प्रदर्शनापर्यंत हजारो लोकांना एकाच वेळेस भेळीसारखा चविष्ट पदार्थ त्यांनी सहजतेने उपलब्ध करुन दिला. 

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काहीतरी करण्याची ओढ राजू यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातच क्रिकेट सामन्यांदरम्यान भेळविक्रीची संकल्पना त्यांना कोणीतरी सांगितली. त्यांनी लगेच या साठी काम सुरु केले आणि आयपीएलमध्ये त्यांना ही संधी मिळाली. मुंबई इंडीयन्सकडून होणा-या सामन्यांदरम्यान त्यांना ही संधी दिली गेली. आता पर्यंत सात आयपीएल सामन्यात त्यांनी वानखेडे, डी.वाय.पाटील व गहुंजे येथील स्टेडीयमवर भेळविक्री केली आहे. 

नोकरीच्या मागे न लागता छोटासा व्यवसाय सुरु केलेल्या राजू यांनी आजच्या सामन्यासाठी स्टेडीयममध्ये फिरुन विक्री करणे व स्टॉलवर विक्रीसाठी 50 मुलांची तर भेळ बनविण्यासाठी 12 जणांची नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे ते अधिकृत विक्रेते बनले आहेत. भेळीसोबतच पाणीपुरी व नमकीन विक्रीही ते करतात.

एका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी काही हजारात भाडे ते मोजतात, अर्थात येथे होणारी गर्दीही त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते. कोणताही व्यवसाय करताना महत्वाकांक्षा ठेवून तो केला तर त्याने प्रगती सहज साध्य करता येते याचे बारामतीचे भेळ व्यावसायिक राजू शेख हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. 

अजून काम करायचे आहे...
मुंबईपर्यंत भेळीच्या माध्यमातून मी येऊन पोहोचलो असलो तरी मला अजून काम करायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी भेळ पोहोचणे गरजेचे आहे, ते लक्ष्य नजरेसमोर ठेवून मी काम करतो आहे- राजू शेख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com