esakal | बारामतीतील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना अजित पवारांची मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जिल्हा उपकेंद्राला देखील बारामतीत मान्यता मिळाली आहे. 

बारामतीतील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना अजित पवारांची मान्यता

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी काही प्रकल्पांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. आज बारामतीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी याबाबत मान्यता दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागास निविदा प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत आज माहिती दिली. शहरातील वसंतराव पवार नाट्यगृह व त्या शेजारी उद्योगभवनाच्या इमारतीचे पूर्णतः नूतनीकरण करण्यासह जुनी भाजी मंडईच्या ठिकाणी नवीन भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आराखड्यास आज अजित पवार यांनी अंतिम मंजूरी दिली. या दोन्ही वास्तूंची निविदा प्रक्रीया आता लवकरच सुरु होणार असून येत्या काही दिवसात कामही सुरु होईल. 

हेही वाचा - जुन्नरची मंत्रा ठरली समुद्रात विक्रमवीर!

याबाबत माहिती देताना किरण गुजर म्हणाले, वसंतराव पवार नाट्यगृहाची इमारत जुनी झाली असून त्यात पुरेसा उजेड व हवा नसते, त्यामुळे हे नाट्यगृह प्रारंभी पाडले जाणार आहे. त्याजागी उद्योग भवन उभारले जाईल. शेजारील उद्योग भवनमधील गाळेधारकांना नव्या इमारतीत गाळे दिल्यानंतर जुन्या उद्योग भवनाची इमारत पाडून तेथे अत्याधुनिक सुविधा असलेले नवीन नाट्यगृह उभारले जाणार आहे. येथे जमिनीखाली दोन मजली पार्किंग सुविधा होणार आहे. किमान पाचशे चारचाकी व दुचाकी वाहने येथे एकाच वेळी बसू शकतील इतके प्रशस्त या इमारतीचे पार्किंग होईल. या ठिकाणी बहुद्देशीय सभागृह देखील साकारणार आहे. तेथे लग्नासह इतर कार्यक्रम घेता येतील. दुसरीकडे जुनी भाजी मंडईतील जुने गाळे पाडून तेथेही भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स साकारणार आहे. या नवीन इमारतीत 192 गाळे असतील. येथे ज्यांची दुकाने आहेत, त्या प्रत्येकाला नवीन इमारतीत गाळा मिळणार असून इमारत उभी होईपर्यंत प्रत्येक दुकानदाराचे पुनर्वसनही नगरपालिका व्यवस्थित करणार आहे. इमारतीचा एकेक टप्पा उभारुन तेथे गाळेधारकांना हलविले जाईल, कोणाचेही यात आर्थिक नुकसान अजिबात होणार नाही, याची नगरपालिका काळजी घेणार आहे. इंदापूर चौक ते गुनवडी चौकादरम्यान अशी ही भव्य इमारत साकारेल. या ठिकाणीही जमिनीखाली दोन मजली पार्किंग असेल व येथेही पाचशे चारचाकी व दुचाकी गाड्या पार्क करता येतील. 

हेही वाचा - संजय राऊतांच्या 'रोखठोक' शैलीला अजित पवारांचं थेट उत्तर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जिल्हा उपकेंद्राला बारामतीत मान्यता मिळाली आहे. कविवर्य मोरोपंत सभागृहाशेजारी असलेल्या बारामती हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या रिकाम्या जागेवर दहा कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक इमारत उभारण्यासही आज अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. यात अत्याधुनिक ग्रंथालय, संदर्भग्रंथ वाचनालय आणि अभ्यासिकेचा यात समावेश असेल. या इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आज पवार यांनी दिल्या आहेत. शिवसृष्टीच्या ठिकाणी पार्किंगसाठी व इतर सुविधांसाठी आणखी 15 एकर जागा शोधण्याच्या सूचना आज अजित पवार यांनी नगरसेवक सुधीर पानसरे यांना दिल्या आहेत. दरम्यान शहरातील भिगवण रस्त्याला समांतर सेवा रस्त्याचे काम रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असल्याने मार्गी लागत नाही, या संदर्भात आज अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन लावून या बाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चा करुन मार्ग काढण्याबाबत बैठक घेण्याची विनंती केली. रेल्वेने या जागेच्या बदल्यात नगरपालिकेकडून 3 कोटी 94 लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. इतकी रक्कम भरण्याची नगरपालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने सुळे यांनी गोयल यांच्याशी चर्चा करण्याची विनंती पवार यांनी केली. 

loading image