बारामती : मायक्रोसॉफ्ट- ऑक्सफर्डच्या मदतीने साकारणार फार्मव्हाईब प्रकल्प

मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ट्रस्टचे इनक्युबेशन सेंटर यांच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसीत करण्याचा हेतू.
Prataprao Pawar
Prataprao PawarSakal
Summary

मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ट्रस्टचे इनक्युबेशन सेंटर यांच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसीत करण्याचा हेतू.

बारामती - मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ट्रस्टचे इनक्युबेशन सेंटर यांच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसीत करण्याचा हेतू असलेल्या सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर फार्माव्हाईब या उपक्रमाचा आज बारामतीत ऐतिहासिक प्रारंभ झाला. बिल गेटस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारत आहे.

ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व ऑक्सफर्ड विद्यापीठातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विभागाचे कोर्स डायरेक्टर डॉ. अजित जावकर यांच्यात या बाबतच्या कराराचे आदानप्रदान केले गेले. या प्रसंगी मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा, मायक्रोसॉफ्टचे प्रोग्रॅम मॅनेजर रियाज पिशोरी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, राजीव देशपांडे, डॉ. अविनाश बारवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते.

रणवीर चंद्रा म्हणाले, कमी खर्चात किफायतशीर शेती व्हावी, धोके दूर व्हावेत, शेतक-यांच्या ज्ञानाचा वापर करुन बेभरवशी शेती अधिक शाश्वत व्हावी, पर्यावरण रक्षणासोबतच अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ऑक्सफर्ड व ट्रस्टच्या मदतीने मायक्रोसॉफ्ट हा प्रकल्प साकारण्यासाठी उत्सुक आहे.

डॉ. अजित जावकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करुन शेती अधिक शाश्वत करण्याचा प्रयत्न असून भविष्यात परदेशातून तज्ज्ञ आणण्यापेक्षा येथील युवकांनाच प्रशिक्षित करण्याचा मानस बोलून दाखविला. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतापराव पवार म्हणाले, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या एकत्रित प्रयत्नातून या प्रकल्पाद्वारे निश्चित मिरॅकल घडेल, केवळ बारामती भारतच नव्हे तर जगात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचा नावलौकीक होईल. बारामती भविष्यात नॉलेज क्रिएशन सेंटर म्हणून उदयास येईल. डॉ. अजित जावकर यांनी यात पुढाकार घेतल्याने आज बारामतीत आंतरराष्ट्रीय प्रकल्प कार्यान्वित होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मायक्रोसॉफ्टचे जगातील दुसरे केंद्र बारामतीत..

जगात अमेरिकेतील वॉश्गिंटन नंतर बारामतीतील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जागेत दुसरे अत्याधुनिक सेंटर मायक्रोसॉफ्ट उभारणार आहे. वॉश्गिंटनच्याच दर्जाचे हे सेंटर असेल अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली. या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकली आहे.

काय असेल हा प्रकल्प

• मायक्रोसॉफ्ट संशोधनाच्या साखळीतील शेती केंद्रीत तंत्रज्ञानाचा नवीन भाग

• मशीन लर्निंग अल्गोरिदम तंत्रज्ञानाद्वारे सुपिकता वाढविणे, उत्पादन वाढ, पिकपध्दतीचे नियोजन, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्तावाढ व खर्च कमी करणे

• ड्रोन, उपग्रह, जमिनीतील सेन्सर्स या द्वारे माहिती गोळा करुन भविष्यातील अत्याधुनिक शेतीचा प्रकल्प साकारणार

• खत, तणनाशक, पाणी व्यवस्थापनासह पावसाचा अंदाज, हवामानातील बदल, या आव्हानांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने वापर व सामोरे जाणे.

• हवामानाचा पिकांवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट एकत्र काम करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com