बारामतीकरांनी केलेल्या सोने खरेदीचे आकडे वाचून चक्रावताल... 

gold
gold

बारामती (पुणे) : बारामती शहरात लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची तुफान विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले. 

लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बारामतीतील सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, मानसिकतेमुळे लोक सोने खरेदी करणार नाहीत, असे सगळे अंदाज फोल ठरवत लोकांनी सोन्याची लयलूट केली. शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बॅंकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बॅंकाबाबतही निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना आणि लग्नसराईचा हंगाम, या कारणांमुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले. 

सराफांनी सांगितलेली कारणे...                लॉकडाउनमुळे लग्नाची पद्धतच बदलून गेली. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाल्याने वाचलेले पैसे लोकांनी सोन्याच्या खरेदी गुंतविल्याचे चंदुकाका सराफ अँड सन्सचे किशोर शहा यांनी सांगितले. सोन्यामध्ये गुंतवणूक ही सध्या लोकांना बदलत्या परिस्थितीत अधिक विश्वासार्ह वाटू लागली आहे. त्यामुळे लोकांनी सोनेखरेदीवर भर दिल्याचे जोतिचंद भाईचंद सराफ पेढीचे शांतिकुमार शहा यांनी सांगितले. ग्रामीण भागात आजही तातडीने पैसे उभारणीचे साधन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही कसलेही पैसे आले तरी लोक सोने खरेदीस प्राधान्य देतात. सोन्याच्या भावात आगामी काळात भावात चांगली वाढ होईल, या अपेक्षेनेही सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक होती, असे महालक्ष्मी ज्वेलर्सचे विनोद ओसवाल यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्यातून तातडीने पैसे उभे राहतात, हीही एक जमेची बाजू आहे. लॉकडाउननंतर आलेल्या नकारात्मक लाटेचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होईल व खरेदीऐवजी सोने मोडून पैसे उभे करण्याकडे लोकांचा अधिक कल असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात लोकांनी सोने खरेदी अधिक प्रमाणात केली. अनेक अंदाज फोल ठरवत लोकांनी पारंपरिक सोन्याच्या खरेदीत रस दाखविला. 

तर आकडे आणखी वाढले असते...                  शारीरिक अंतराचे बंधन व गर्दी करायची नाही, हे बंधन असल्यामुळे विक्रीवर मर्यादा आल्या होत्या, अन्यथा विक्री अधिक वाढली असती, असेही अनेकांनी सांगितले. सोन्याचा भाव 46 हजारांवर जाऊनही लोकांनी भावाचा विचार न करता सोने खरेदी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com