esakal | बारामतीत होणार राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक I Baramati
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Bus Stand

बारामतीत होणार राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती - राज्यातील सर्वाधिक सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत आकार घेऊ लागले असून येत्या सहा महिन्यात हे बसस्थानक उभारुन पूर्ण होईल अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाचे प्रमुख रमाकांत गायकवाड यांनी दिली.

बारामतीतील बसस्थानकाची स्थिती दयनीय झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत जुन्या बसस्थानकाच्या जागी नवीन सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार आता या बसस्थानकाचे काम वेगाने सुरु आहे.

सुमारे 50 कोटी रुपये खर्चून ही विमानतळाच्या तोडीची इमारत उभी राहणार आहे. या इमारतीत 22 बसथांबे असतील तर डेपोच्या पार्किंगमध्ये रात्री जवळपास 87 बसेस उभ्या राहू शकतील. बारा दुकानगाळे अस्तित्वात येणार असून प्रवाशांच्या सुविधेसाठी कँटीनचीही सोय केली जाणार आहे.

हेही वाचा: लॉकडॉऊनच्या निर्बंधांमुळे शेकडो ‘अरंगेत्रम’ रखडले!

आगारप्रमुख तसेच स्थानकप्रमुखांसाठी कार्यालयाचीही सुविधा दिली जाणार असून महिला प्रवासी तसेच महिला वाहकांच्यासाठीही हिरकणी कक्ष स्थापन होणार आहे. बसस्थानकाच्या आवारात आगारप्रमुखांसाठी निवासस्थानाचीही सोय केली जाणार असून चालक व वाहकांसाठी प्रशस्त व सुविधा असलेला विश्रांती कक्षही तयार होणार आहे.

प्रवेशद्वाराची जागाही बदलणार...

सध्या इंदापूर रस्त्याच्या बाजूने बसेस स्थानकात ये जा करतात. हे काम पूर्ण झाल्यावर बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्वेच्या बाजूला केले जाणार आहे. इंदापूर चौकापासून ते गुनवडी चौकापर्यंत गर्दी असते ही बाब विचारात घेता एसटीच्या वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दृष्टीक्षेपात बारामतीचे नवीन बसस्थानक

• 50 कोटी रुपयांचा खर्च होणार

• 22 फलाटांवर एकाच वेळेस 22 बसेस उभ्या राहू शकतील

• चालक वाहकांसाठी सुसज्ज विश्रांतीकक्ष सुरु होणार

• महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा मिळणार

• बसस्थानकाच्या मध्यवर्ती भागात लँडस्केपिंग गार्डन

• विमानतळाप्रमाणे फील देण्याचा प्रयत्न

• राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच बसस्थानक साकारणार

loading image
go to top