प्लॅस्टिक बंदीवर बारामती नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

मिलिंद संगई
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक संकलन मोहिम सुरु करण्यात आली आहे. येत्या 5 मे पर्यंत सर्वांनी आपल्या कडे बंदी असलेले प्लॅस्टिक नगरपालिकेकडे जमा करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

बारामती - प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी बारामती नगरपालिकेने आता मनावर घेतले असून येत्या 5 मे पासून दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव व मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी याबाबत माहिती दिली. 

प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), थर्माकोल, प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या ताट, वाटी, चमचा, कप, प्लेट, ग्लास अशा वस्तू, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकींगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच, अन्नपदार्थ व धान्य साठविण्यासाठी पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक व प्लॅस्टिकचे वेष्टन यांचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण व घाऊक तसेच किरकोळ विक्रीवर तसेच वाहतूकीवरही बंदी घालण्यात आली आहे. 

नगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक संकलन मोहिम सुरु करण्यात आली आहे. येत्या 5 मे पर्यंत सर्वांनी आपल्या कडे बंदी असलेले प्लॅस्टिक नगरपालिकेकडे जमा करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व शासकीय व अशासकीय कार्यालये व संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपट व नाट्यगृह, औद्योगिक संस्था, समारंभाचे हॉल व लग्नकार्यालय, हॉटेल्स, धाबे, दुकानदार, मॉल्स व इतर विक्रेते, केटरर्स, फेरीवाले, वाहतूकदार, भाजीपाला व फळे विक्रेते या सह इतरही नागरिकांनी या मोहिमेत नगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. 
प्लॅस्टिक बंदीच्या कालावधीनंतर प्लॅस्टिक आढळून आल्यास प्रथम वेळेस पाच हजार, दुसऱ्या वेळेस दहा हजारांच्या दंडाची आकारणी केली जाणार आहे. दोनदा संधी देऊनही तिसऱ्यांदा जर प्रतिबंधित प्लॅस्टिक सापडल्यास 25 हजारांचा दंड तीन महिने कारावासाची तरतूद या बाबतच्या कायद्यात असून त्याचा वापर प्रशासन करणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Baramati Municipal Council has made significant decision on plastic ban