राज्य शासनानाच्या आदेशाचा बारामती नगरपालिकेला विसर

मिलिंद संगई
गुरुवार, 12 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचा बारामती नगरपालिकेच्या प्रशासनाला विसर पडल्याचे पुढे आले आहे. नव्या निर्देशांनुसार नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठका पार पडल्यानंतर सात दिवसाच्या आत त्या सभेचे इतिवृत्त नागरिकांच्या माहितीसाठी नगरपालिकेने आपल्या संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी झालेल्या बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त 12 एप्रिल पर्यंत संकेतस्थळावर आलेले नव्हते. 

नगरपालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा आणि होणा-या बैठकांमधील निर्णयाची नागरिकांनाही माहिती व्हावी या उद्देशाने नगरविकास विभागाने बैठकांचे इतिवृत्त संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी टाकण्याचे निर्देश जारी केले आहेत. बारामती नगरपालिकेचे संकेतस्थळच शोधून सापडत नसल्याचे आज निदर्शनास आले. काही तांत्रिक बाबींमुळे पेमेंट गेटवे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अडचणी येत असल्याचे नगरपालिका सूत्रांनी सांगितले. 

अनेकदा बैठकांचे इतिवृत्त अनेक महिने लिहीले न जाणे, ज्या विषयांची चर्चाच झालीच नाही किंवा निर्णयच झालेले नाहीत ते इतिवृत्तात घुसडण्यापासून ते अनेक उद्योग यात होत होते. यावर निर्बंध आणून लोकांनाही याची माहिती सविस्तरपणे व्हावी या साठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. 

नगरपालिकेची सभा झाल्यानंतर सात दिवसात संकेतस्थळावर इतिवृत्त टाकायचे असल्याने लगेच दोन तीन दिवसात हे इतिवृत्त व्यवस्थित निश्चित करण्याचे काम प्रशासनाला करावेच लागणार आहे. एकदा हे इतिवृत्त संकेतस्थळावर आल्यानंतर त्यात बदल करता येणार नसल्याने यात खऱ्या अर्थाने पारदर्शकता तर राहिलच शिवाय शहराबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची माहिती नागरिकांनाही मिळणार आहे. 
तांत्रिक अडचणींमुळे इतिवृत्त टाकले नाही

दरम्यान आमचे इतिवृत्त पीडीएफ फाईलमध्ये तयार आहे, मात्र तांत्रिक अडचणी येत आहेत, त्या मुळे वेळेत हे इतिवृत्त टाकता आले नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन तातडीने संकेतस्थळावर इतिवृत्त टाकणार आहोत, असे बा.न.प. कार्यालय प्रमुख संजय चव्हाण यांनी सांगितले.  

Web Title: The Baramati Municipality forgot the order of the State Government