बारामतीत या 'साहेबां'नी स्वतःच केलं टँकरच्या पाण्याचं वाटप

विजय मोरे
शुक्रवार, 26 मे 2017

तहसीलदार हनुमंत पाटील यांनी येथील ओढा खोलीकरणाच्या कामाला शुक्रवारी भेट दिली. तहसीलदार पाटील भेट देऊन परतत असताना वाटेत त्यांना बोपळबेट वस्ती येथे पाणीवाटप करणारा सरकारी टँकर दिसला. हे औचित्य साधत तहसीलदार पाटील यांनी येथील लोकांशी 'साहेब' म्हणून नाही, तर जनतेचा सेवक या नात्याने लोकांशी सुसवांद साधण्याचा प्रयत्न केला.

उंडवडी : वेळ दुपारी बाराची.. बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार हद्दीतील बोपळबेट वस्तीतील लोक भर उन्हात सरकारी टँकरची वाट पाहत बसले होते. अचानक पाण्याचा टँकर आला.. पाण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. टँकर पाठोपाठ एक पांढऱ्या रंगाची जीप आली.. त्या जीपमधील एक व्यक्ती खाली उतरली आणि टँकरच्या पाण्याचा पाईप हातात धरून ते पाण्याचं वाटप करू लागले. लोक आपापल्या भांड्यांत पाणी भरून घेत होते. ती व्यक्ती लोकांना आपुलकीने विचारपूस करीत स्थानिक समस्या जाणून घेत होती. काही वेळाने एका पदाधिकाऱ्याने साहेबांना ओळखले... ते होते बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील.

नेहमी ग्रामपंचायतीचा शिपाई टँकरच्या पाण्याचे वितरण करत असतो. त्यामुळे पाणी देणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. हे आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत हे कळताच सगळेच गावकरी अचंबित होऊन स्वतः पाणीवाटप करणाऱ्या तहसीलदारांकडे पाहू लागले. कारण त्यांनी तहसीलदारांना गावात पहिल्यांदाच अशा रुपात पाहिले होते. निमित्त होते उंडवडी कडेपठार येथील ओढा खोलीकरणाच्या कामाचे.

तहसीलदार हनुमंत पाटील यांनी येथील ओढा खोलीकरणाच्या कामाला शुक्रवारी भेट दिली. तहसीलदार पाटील भेट देऊन परतत असताना वाटेत त्यांना बोपळबेट वस्ती येथे पाणीवाटप करणारा सरकारी टँकर दिसला. हे औचित्य साधत तहसीलदार पाटील यांनी येथील लोकांशी 'साहेब' म्हणून नाही, तर जनतेचा सेवक या नात्याने लोकांशी सुसवांद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतः लोकांना टँकरचे पाणी वाटप करत लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, टँकर चालकाच्याही अडचणी समजावून घेत, त्या टँकरमधील तांब्याभर पाणी पिऊन पाण्याची तपासणीही केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना व महिला वर्गाला पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले. यावेळी मंडल अधिकारी एम. पी. सय्यद उपस्थित होते. 

Web Title: baramati news baramati tehsildar involves in water distribution