जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करा, विनाकारण वाद नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राज्यापुढे अनेक महत्वाचे प्रश्न उभे असताना नको त्या गोष्टीवर वादविवादाला अर्थ नाही, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादाबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

Ajit Pawar : जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करा, विनाकारण वाद नको

बारामती - राज्यापुढे अनेक महत्वाचे प्रश्न उभे असताना नको त्या गोष्टीवर वादविवादाला अर्थ नाही, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, महागाई, बेरोजगारी, राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत, रब्बीच्या खरीपाच्या पेरण्या अडचणीत आहेत, पिकविम्याचे पैसे शेतक-यांना मिळायला हवेत, ओला दुष्काळ जाहिर होणे गरजेचे आहे, असे असताना ज्या गोष्टीला अनेक वर्षे उलटून गेलेली आहेत, त्यांचा उल्लेख करुन वाद निर्माण करण्याला अर्थ नाही, कोणीही हे करु नये असे माझे मत आहे.

अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्या बाबत विचारले असता, मीही या बातम्या पाहिल्या, मध्यंतरी त्यांच माझ बोलणही झालेल होत, आम्ही संपर्कात आहोत, या बाबत वस्तुस्थिती माहिती करुनच मी या वर बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

जो पर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे व सोनिया गांधी यांचे महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत, तो वर महाविकास आघाडीला कसलाही धोका नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशन अजून सुरू व्हायला अजून अवकाश आहे, इतक्या लवकर तुम्हाला माझे मुद्दे सांगून माहिती देऊ इच्छित नाही, कारण मी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोललेली आहे, त्याच्यामध्ये सगळे आम्ही एकोप्यांनी बसू चर्चा करू आणि त्याच्यात मुद्दे ठरवू.

आता मुद्दे जर मी तुम्हाला सांगितले इतर नेते अजित पवार तुम्ही आधीच मुद्दे सांगितले, कशाला आम्हाला बोलवले शेवटी ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात त्यावेळेस असे निर्णय आधी घ्यायचे नसतात चर्चा विनिमय करून आम्ही सगळे एकमताने कुठेतरी त्या विषयाबद्दल येऊन आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन ते सांगू.

विकासकामांच्या स्थगितीबाबत बोलताना जी विकास कामे मंजूर आहेत, ती थांबविणे उचीत नाही. तुम्ही नवीन कामे जरुर सुरु करा, त्याला गती द्या, या बाबत काही दुमत नाही. मात्र विरोधकांच्या कामांना सापत्न वागणूक देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. काही बाबतीत फ्लायओव्हर व पूलांच्या कामांची स्धगिती उठवली असल्याचेही त्यांनी सांगितले.