बारामती - शालेय व महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई

मिलिंद संगई
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

बारामती शहर - शालेय व महाविद्यालयीन मुलींना होणा-या छेडछाड व मानसिक त्रासाविरोधात पोलिसांनी आता कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी आज बारामतीत पत्रकारांना ही माहिती दिली. 

झारगडवाडी येथील एका महाविद्यालयीन युवतीच्या आत्महत्येनंतर हा विषय आता ऐरणीवर आला आहे. बारामती हे गेल्या काही वर्षात शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथे विद्या प्रतिष्ठान, शारदानगर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, शिवनगर विद्या प्रसारक या सह इतरही अनेक महाविद्यालय तसेच शाळा आहेत. 

शालाबाह्य युवक शाळा व महाविद्यालयांच्या आवारात येऊन मुलींची छेडछाड, टिंगलटवाळी तसेच मोबाईलवर मेसेज पाठविण्यापर्यंत अनेक मार्गांनी छळ करतात. शिक्षण बंद होऊ नये या भीतीपोटी अनेकदा मुली या बाबी पालक किंवा शिक्षकांनाही सांगत नाहीत. त्या मुळे रोडसाईड रोमिओंची हिंमत वाढू लागली आहे. बारामती व परिसरात निर्भया पथक, दामिनी पथकासह गुन्हे शोध पथकांच्या पोलिसांमार्फत यापूर्वी हि कारवाई करण्यात आली आहेत परंतु या पुढील काळात प्राधान्याने नियमितपणे महाविद्यालय तसेच शाळांच्या परिसरात अशा टवाळखोरांना पोलिस चांगलाच प्रसाद देणार आहेत. 

अनेकदा युवकांचे करिअर उध्वस्त होऊ नये या उद्देशाने पोलिस सहानुभूतीची भूमिका घेतात, आता मात्र अशा युवकांवर थेट कायदेशीर कारवाईचाच इशारा पोलिसांनी दिला आहे. 

पालकांनी आपला मुलगा नेमका काय करतो, कोणासोबत वावरतो, त्याचे मित्र कोण आहेत, तो दिवसभर काय करतो याची माहिती ठेवणे अपेक्षित आहे. मुलींची टिंगलटवाळी करताना आपला मुलगा पोलिस कारवाईत सापडणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायची असल्याचा इशाराही नारायण शिरगावकर यांनी दिला आहे. 

साध्या वेशातील पोलिस करणार कारवाई
मुलींना त्रास देणा-या रोडसाईड रोमिओंवर साध्या वेशातील पोलिसही कारवाई करणार असल्याने ही कारवाई अचानकच होईल. त्या मुळे ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयाच्या आवारात वावरणा-या युवकांवर कारवाई होणार आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी, क्लास प्रमुख यांनी ही स्वतः लक्ष घालून पोलिसांना कळवणे, पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे.

थेट अधिका-यांकडेच तक्रारी करा
ज्या मुलींना असा छेडछाडीचा किंवा इतर काही मानसिक त्रास कोणी देत असेल तर थेट उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर (9527513100) किंवा पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ (9923419799) यांच्याशी विद्यार्थींनीनी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, मात्र तातडीने पोलिस या बाबत कारवाई करतील, असे स्वताः शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Baramati - Strict action against those who are harrasing school and college girls