esakal |  बाप रे, बारामतीत काही महिन्यांचा पाऊस काही तासातच कोसळला 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati rain

बारामती शहर व तालुक्यातील विविध भागांना काल संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अतिवृष्टीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट, जोडीला सोसाट्याचा वाऱ्यामुळे भयावह वातावरण होते.

 बाप रे, बारामतीत काही महिन्यांचा पाऊस काही तासातच कोसळला 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहर व तालुक्यात सर्वदूर काल ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. काही महिन्यांचा पाऊस काही तासात पडल्याने तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. अनेक वर्षांनी असा पाऊस बारामती पंचक्रोशीत झाल्याचे सांगितले जात आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय पातळीवर देण्यात आले आहेत. वडगाव निंबाळकर मंडल वगळता संपूर्ण तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती शहर व तालुक्यातील विविध भागांना काल संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अतिवृष्टीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट, जोडीला सोसाट्याचा वाऱ्यामुळे भयावह वातावरण होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शहरातील सखल भागात काही मिनीटातच तळी साचली तर रस्त्यांवरुन वेगाने पाणी वाहत होते. बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे जलसंधारणाच्या सर्व कामात तुडुंब पाणी भरले. सिमेंट बंधारे, नाले ओढे, तलावासह विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. बारामती तालुक्याच्या पावसाची सरासरी या एकाच पावसाने ओलांडली असून, या पावसाचा कमालीचा दिलासा तालुक्याला मिळेल, अशी चिन्हे आहेत. 

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी तालुक्यातील साबळेवाडी, सुपे, बोरकरवाडी, कारखेल, उंडवडी सुपे या भागाचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली. अनेक ठिकाणी उसाच्या पिकासह बाजरी, मका, सोयाबिन या पिकांचे नुकसान झाले आहे, उंडवडी सुपे येथे घरात पाणी शिरुन नुकसान झाले आहे, तर अंजनगाव येथे एका पोल्ट्रीशेडचेही नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. 

पुणे महापालिकेला जमत नसेल तर जंबो लष्करी अधिकाऱ्यांकडे सोपवा

उपलब्ध आकडेवारीनुसार बारामती तालुक्यात गाडीखेल येथे सर्वाधिक म्हणजे तब्बल 172 मि.मी. इतका पाऊस काही तासात कोसळला. पावसाची आकडेवारी (मि.मी. मध्ये) पुढील प्रमाणे : बारामती- 105, उंडवडी क.प.- 95, सुपे- 110, लोणी भापकर- 71, माळेगाव कॉलनी- 86, वडगाव निंबाळकर- 60, पणदरे- 80, मोरगाव 67, लाटे- 62, बऱ्हाणपूर- 110, सोमेश्वर कारखाना- 42, जळगाव कडेपठार- 120, आठ फाटा होळ- 67, माळेगाव कारखाना- 50, मानाजीनगर- 87, चांदगुडेवाडी- 82, काटेवाडी- 68, अंजनगाव- 130, सोनवडी सुपे- 131, जळगाव सुपे- 100, कृषी विज्ञान केंद्र- 70, सोनगाव- 56, कटफळ- 152, सायंबाचीवाडी- 68, चौधरवाडी- 59, नारोळी- 60, काऱ्हाटी- 84, गाडीखेल- 172, जराडवाडी- 130.